ठाणे : बिबट्या घरात, कुटुंब बाहेर… | पुढारी

ठाणे : बिबट्या घरात, कुटुंब बाहेर...

डोळखांब / कसारा; पुढारी वृत्तसेवा :  ठाण्यातील ग्रामीण भागात घराजवळ, शेतात, वस्तीत बिबट्याची दहशत पाहायला मिळत आहे. आता, शहापूर तालुक्यातील खर्डी वनविभागाच्या हद्दीतील उंबरखांड गावात लहु नारायण निमसे यांच्या राहते घरी सोमवारी रात्री
दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शिरकाव केला. त्यावेळी, लहु निमसे यांनी प्रसंगावधान राखत मोठ्या शिताफिने बिबट्याला कोंडून ठेवले. या घटनेची खबर वनविभागाला लागताच बोरिवली येथुन रेस्क्यु कँप मागविण्यात आला.

मंगळवारी दुपारी एक वाजता डॉट पध्दतीने भुल देवुन या बिबट्याला वनविभागाने ताब्यात घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला. शहापूर तालुक्यातील खर्डी वनविभागाच्या हद्दीतील उंबरखांड येथील लहु निमसे यांच्या रहाते घरी सोमवार (22 ऑगस्ट) रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास बिबट्याने शिरकाव केला. घराच्या पाठीमागे गोठ्यात बांधलेले दोन बैल तसेच खुराड्यात काही कोंबड्या होत्या. बिबट्याला पहाताच कोंबड्या ओरडु लागल्याने लहु निमसे यांचा मुलगा मधुकर यांना जाग आली. त्यांना खोलीमध्ये बिबट्या दिसला. बाजुच्या खोलीत त्यांचा मुलगा झोपलेला होता. याचे प्रसंगावधान राखत मधुकर यांनी बिबट्याच्या खोलिचा दरवाजा बंद केला. याची माहिती मिळताच शहापूरचे उपवनसंरक्षक सचिन रेपाळ आणी धसईचे आरएफओ दर्शन ठाकुर यांचेसह खर्डी ,शहापूर, विहीगाव,
वाशाळा येथील आरएफओ हजर झाले.

पुढे बोरिवली येथील रेस्क्यु कँपला घटनेची माहिती देण्यात आली. हे पथक दाखल होताच मंगळवारी बिबट्याला डॉट पध्दतीने भुल देवुन दुपारी 1 वाजता वनविभागाने ताब्यात घेतले. सदर बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून संध्याकाळी त्याला अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती शहापूर उपवनसंरक्षक सचिन रेपाळे यांनी दिली

जंगलांचे काँक्रीटीकरण, वन्यजीव गावात

शहापूरात आलेले वेगवेगळे प्रकल्प, जंगलांचे काँक्रीटीकरण यामुळे वन्यजीव मानववस्तीमध्ये शिरकाव करीत शेतकर्‍यांची जनावरे व कोंबड्या फस्त करीत आहेत. बिबट्या शक्यतो मनुष्यावर हल्ला करीत नाही. त्याला डिवचलेच तर स्वसंरक्षणासाठी तो हल्ला करतो.

बिबट्यांचे शहापूर

सन 2018 रोजी शहापूरात वनविभागाने केलेल्या प्राणी गणनेमध्ये बिबट्याचा उल्लेख नसल्याचे आढळून आले.परंतु शहापूर तालुक्यात खर्डी, डोळखांब, सारंग परी,वाशाळा, आजोबा देवस्थान,चोंढे परिसरात आतापर्यंत आठ ते दहा बिबटे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जुन्नर येथील रेस्क्यु कँपमधून काही नरभक्षक बिबट्यांचे सवयी बदलून शहापूरात सोडले असल्याची अधिकृत माहिती आहे.

Back to top button