ठाणे : गुंतवणुकदार कंपनीकडून डोंबिवकरांची 71 लाखांची फसवणूक | पुढारी

ठाणे : गुंतवणुकदार कंपनीकडून डोंबिवकरांची 71 लाखांची फसवणूक

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : मोठ्या लाभाचे आमिष दाखवून गुंतवणुकदारांचा विश्वास संपादन करुन डोंबिवलीतील एका खासगी गुंतवणुकदार कंपनीने येथील 7 गुंतवणूकदारांची 71 लाख 48 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात खासगी गुंतवणुकदार कंपनीच्या संचालकांविरुध्द तक्रार केली असून पोलिसांनी महाराष्ट्र ग्राहकांचे हितसंबंध कायद्याने गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

शशिकांत सिताराम नाटेकर (61) यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अशाच पध्दतीने दीप्ती संजय पिंपुटकर (फसवणूक रक्कम 9 लाख 58 हजार), वैशाली संजय पाटील (2 लाख 40 हजार), लहु नामदेव पांडे (35 लाख), स्वप्नाली बाविस्कर (10 लाख), मयुरेश रमेश तरे (4 लाख 50 हजार), सैफाली सुनील म्हात्रे (10 लाख) अशी फसवणूक झालेल्या गुंतवणुकदारांची नावे आहेत. तक्रारदार शशिकांत नाटेकर यांची पाच लाखांची फसवणूक झाली आहे. डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोडला असलेल्या कस्तुरी प्लाझा संकुलातील लोटस (इंडिया वेल्थ) मॅनेजमेंट एलएलपी या कंपनीचे संचालक भाविन देढीया, पियुश शहा, हेनिल महेश देढीया, चेतन गुलाबचंद छेडा, महेश रमेश पाटील, दीपक मधुकर कुंथेकर, गिरीश देढीया यांच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारी 2021 ते 18 ऑगस्ट या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.

यातील तक्रारदार शशिकांत नाटेकर या ज्येष्ठ नागरिकाला लोटस वेल्थ कंपनीचे मालक भाविन देढीया इतर 7 संचालकांनी मोठ्या लाभाचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास सांगितले. तत्पूर्वी शशिकांत यांचा विश्वास संपादन केला. त्यांना लोटस वेल्थ कंपनीतील गुंतवणूक योजनेत 5 लाख रुपये गुंतवणूक करण्यास सांगितले. या रकमेवर शशिकांत यांना मासिक नफा आणि मूळ मुद्दल रकमेतील 3 लाख 50 हजार रुपये परत करणे आवश्यक होते. दीड वर्षात आपणास आपल्या रकमा परत मिळत नसल्याने संचालकांनी आपली फसवणूक केली आहे. हे लक्षात आल्याने गुंतवणुकदारांनी शशिकांत नाटेकर यांच्या पुढाकाराने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे. जमा केलेली रक्कम या संचालकांनी स्वत:च्या फायद्याकरिता वापरुन त्याचा अपहार केल्याचा गुंतवणुकदारांचा आरोप आहे.

Back to top button