व्‍हिडिओ : डोंबिवलीत वाहतूक पोलिसाला बोनेटवरून नेले फरफटत | पुढारी

व्‍हिडिओ : डोंबिवलीत वाहतूक पोलिसाला बोनेटवरून नेले फरफटत

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : डोंबिवलीतील टंडन रस्त्यावर कार चालकाने वाहतूक पोलिसाला बोनेटवरून फरफटत नेल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. यामध्ये बाळासाहेब होरे (वय ४४) हे हवालदार जखमी झाले आहेत. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील टंडन रस्त्यावर बुधवारी रात्री वाहतूक नियंत्रणासाठी बाळासाहेब होरे तैनात  होते. येथील एस.के.शाळेजवळ भरधाव वेगाने आलेल्या कारला त्‍यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला; पण चालकाने कारचा वेग वाढवून होरे यांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. होरे यांनी कारच्या बोनेटचा आधार घेत वायपरला घट्ट पकडले होते. तरीही चालकाने कारचा वेग आणखीन वाढवून सुसाट गाडी चालवतच राहिला. सुमारे दहा मिनिटे हा थरार रामनगर भागातील टंडन रस्ता ते चिपळणूकर मार्गावर सुरू होता. यामध्ये हवालदार होरे जखमी झाले. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

यावेळी होरे यांचेसोबत असलेले वाहतूक सेवक दिनकर सोमासे यांनी कारचा पाठलाग करत वाहन क्रमांक मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केला. याबाबतची माहीती वाहतूक पोलिसांनी रामनगर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर रामनगर पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेत भोपर गावातून अल्‍पवयीन चालकाला कारसह ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा :

Back to top button