चंद्रपूर : दोन दिवसांपासून पुरात अडकलेल्या २२ ट्रक चालकांना सुखरूप बाहेर काढले | पुढारी

चंद्रपूर : दोन दिवसांपासून पुरात अडकलेल्या २२ ट्रक चालकांना सुखरूप बाहेर काढले

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपासून पुरात अडकून असलेल्या २२ स्थानिक व परराज्यातील ट्रक चालकांना सुखरूप बाहेर काढण्यात गडचांदूर पोलिसांना यश आले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर-धानोरा मार्गावरील भोयगावजवळ मध्यरात्री पोलिसांनी ही कामगिरी बजावली.

चंद्रपूर जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून संततधार मुसळधार पाऊस सुरू आहे. इरई धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडण्यात आले तर गोसेखुर्द धरणाचे दोन व दीड मीटरने ३३ दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात वैनगंगा भरली आहे. जिल्ह्यात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर-धानोरा मार्गावरील भोयगाव जवळ दोन दिवसांपासून २२ चालक आपल्या ट्रकमध्येच अडकून पडले होते. वर्धा नदीचा प्रवाह सतत वाढत असल्याने वाहनचालक बाहेर पडू शकत नव्हते. दोन दिवसांपासून ट्रक चालक ट्रकमध्येच अडकले अआहेत. सभोवती पूर असल्याने ते निघू शकत नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली.

लगेच पोलिस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले. गडचांदूर पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या बचाव पथकाने भोयगावकडे रात्रीच कूच केली. भोयगावमधून ट्रकचालकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र पाण्याचा प्रवाह सतत वाढत असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत होता. वेळ रात्रीची होती, पाण्याचा प्रवाह वाढत होता. अखेर मध्यरात्री २ वाजता पोलिसांनी सर्व वाहनचालकांना मुसळधार पावसात रेस्क्यू करून बाहेर काढण्यासाठी बोटीचा सहारा घेतला. अखेर प्रयासानंतर पुराच्या पाण्यातून ट्रकचालकांना सुखरूप बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. वाहनचालकांमध्ये ६ स्थानिय तर १६ बाहेर राज्यातील होते.

पोलिस प्रशासन जर वेळेत पोहोचले नसते तर आम्ही आज सुखरूप बाहेर आलो नसतो, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांनी व्यक्त करून पोलिसांचे आभार मानले. गडचांदूर पोलिसांनी सर्व ट्रकचालकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे.

Back to top button