ठाणे : पांढरतारा बंधारा पाण्याखाली; नागरिकांचा संपर्क तुटला | पुढारी

ठाणे : पांढरतारा बंधारा पाण्याखाली; नागरिकांचा संपर्क तुटला

खानिवडे, वसई: विश्वनाथ कुडू : गेल्या दोन दिवसांपासून वसईसह ग्रामीण भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. आज (दि.५) दिवसभर संततधार सुरूच होती.  या भागातील नद्या, नाले व ओहोळ तुडुंब भरून वाहू लागले असून, तानसा नदी दुथडी भरून वाहत आहे. तर काही ठिकाणी नदीने आपला किनारा सोडला आहे. सखल भागात पाणीच पाणी झाले आहे. पांढरतारा बंधारा पावसामुळे पहिल्यांदाच पाण्याखाली गेला आहे.

सोमवारी रात्री नऊ वाजता या बंधाऱ्यावर सुमारे दीड ते तीन फूट पाणी होते. यामुळे पलिकडील रहिवाशांचा उसगावमार्गे होणारा संपर्क तुटला आहे. यामुळे पलीकडील रहिवाशांना महामार्गावरील भालिवली बाजूने साधारण १३ किलोमीटर वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.

उसगावमार्गे पांढरतारा या बंधाऱ्यावरून जाणारा हा रस्ता पलीकडील नवसई, भाताणे, आडणे, थळ्याचा पाडा येथे पोहोचतो. या गावांसह २५ ते ३० छोटे मोठे पाडे व वस्त्यांकडे जाण्यासाठी हा मार्ग कमी अंतराचा आहे. परंतु, हा बंधारा कायम पावसाळ्यात पाण्याखाली जातो. तसेच हा बंधारा खचू लागल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. मात्र, अत्यंत जवळचा मार्ग म्हणून वाहनधारक याच मार्गाचा जास्त वापर करतात. त्यामुळे या बंधाऱ्याची उंची वाढविण्याची मागणी नागरिक आणि वाहनधारकांतून होऊ लागली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button