स्वस्त दरात मास्कचे आमिष दाखवून 30 लाखांची फसवणूक | पुढारी

स्वस्त दरात मास्कचे आमिष दाखवून 30 लाखांची फसवणूक

ठाणे : संतोष बिचकुले :  स्वस्त दरात दीड कोटींचे मास्क देण्याचे आमिष दाखवून महिलेची 30 लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या भामट्याला बेड्या ठोकण्यात आल्या. ही कारवाई साकीनाका पोलिसांनी नवी मुंबई परिसरात केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आल्याचे पोलिसांनी शनिवारी दै. पुढारीला सांगितले.
साकीनाका परिसरात मेहजबीन खान यांच्या मालकीची इलेक्ट्रॉनिक कंपनी आहे. कोविड काळात मेहजबीन यांच्याही कपंनीला फटका बसला. या संकट काळात मास्कची मागणी दिवसेंदिवस वाढत होती. सदर बाब लक्षात घेऊ न त्यांनी मास्कचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. मास्क मॅनिफॅक्‍चर करणार्‍या कंपनीच्या शोधात असताना एका डिलरने मेहजबीन यांची नवी मुंबईतील नास्टर लिमिटेड कंपनीच्या नाजीर इब्राहीम खान (52) याच्याशी ओळख करून दिली. त्यांच्यात स्वस्त दरात मास्क देण्याबाबत करार झाला.
त्यासाठी नाजीरने 30 लाख रुपये अ‍ॅडवान्स मागितला. त्यानुसार महजबीन यांनी 29 मे 2020 रोजी आरटीजीएसद्वारे 30 लाख रुपये नाजीरच्या खात्यात ट्रान्सफर केले. पैसे मिळाल्यानंतरही त्याने महिलेला मास्कचा पुरवठा केला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महजबीन हिने साकीनाका पोलिसांकडे तक्रार केली.

एका नामांकित फूड ऑर्डर करणार्‍या कंपनीच्या अ‍ॅपमुळे आरोपी जाळ्यात

महिलेच्या तक्रारअर्जावरून साकीनाका पोलीस ठाण्याचे वपोनि बळवंत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धीरज गवारे, पोउपनि लोणकर, पोना गायकर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. आरोपीचा मोबाईल बंद असल्याने तपास करण्यात अडचणी येत होत्या. तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीचे विश्‍लेषण केले असता आरोपीने एका नामांकित कंपनीच्या अ‍ॅपवरून जेवणाची ऑर्डर केल्याचे निष्पन्‍न झाले. त्यानुसार पोलिसांनी आरोपी नाजीर इब्राहीम खान याला नवी मुंबईतील राहत्या घरातून अटक केली असून या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Back to top button