ठाणे : जिल्ह्यात जल जीवन मिशनला घरघर | पुढारी

ठाणे : जिल्ह्यात जल जीवन मिशनला घरघर

ठाणे : पुढारी वृत्तसेवा
केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणार्‍या जलजीवन मिशन या योजनेला घरघर लागल्याचे चित्र आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत जानेवारी 2022 पर्यंत 1 लाख 38 हजार 436 घरांना नळ जोडण्या देण्यात आल्या होत्या. तर, जुन 2022 पर्यंत 1 लाख 42 हजार 771 नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. या योजनेअंतर्गत 2024 अखेर पर्यंत प्रत्येक घरात नळ जोडणी देण्याचा दावा करण्यात येत आहे. असे असले तरी अवघ्या सहा महिन्यात केवळ 4 हजार 335 घरांनाच नळ जोडणी देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हे उद्दिष्ट 2024 पर्यंत पूर्ण होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे. तसेच गावातील महिलांचा पाणी आणण्याचा त्रास कमी व्हावा यासाठी केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत गावातील प्रत्येक घरात नळ जोडणी देण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातही ही योजना राबविण्यात येत असून 2024 अखेरपर्यंत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 2 लाख 57 हजार 775 घरात नळ जोडणी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार, जानेवारी 2022 पर्यंत 1 लाख 38 हजार 436 घरांना नळ जोडण्या देण्यात आल्या होत्या. तर, जून 2022 पर्यंत 1 लाख 42 हजार 771 घरात नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. या आकडेवारीतून असेच स्पष्ट होत आहे की, अवघ्या सहा महिन्यात केवळ 4 हजार 335 घरांनाच नळ जोडणी देण्यात आल्या आहेत.

प्रशासकीय मान्यता मिळण्यास होतोय विलंब

नळ जोडणी करण्यापूर्वी काही पूर्व नियोजित कामे करावी लागतात. ही कामे करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळणे गरजेचे असते. त्यानंतर, निविदा काढण्यात येत असून नळ जोडणीचे काम हाती घेण्यात येत असते. त्यानुसार, सध्या 841 कामांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यापैकी 465 कामांना तांत्रिक मान्यता तर, 376 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. जुलै अखेर पर्यंत सर्व पूर्व नियोजित कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. ही कामे जेव्हा पूर्ण होतील, त्यानंतर नळ जोडणीची कामे हाती घेण्यात येतील असे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासकीय मान्यता मिळण्यास विलंब होत असल्यामुळे नळ जोडणीचे काम संथ गतीने सुरु असल्याचे चित्र आहे.

जल जीवन मिशनची अंमलबजावणी आणि नियोजनाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. जुलै अखेरपर्यंत याचे पूर्व नियोजित कामांचे नियोजन पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुसार, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग काम करत आहे. तसेच नळ जोडणीचे जे उर्वरित उद्दिष्ट आहे ते मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येईल.
-अर्जुन गोळे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठाविभाग, जिल्हा परिषद ठाणे

Back to top button