डोंबिवलीत मोलकरणींकडून मालकाचे घर साफ | पुढारी

डोंबिवलीत मोलकरणींकडून मालकाचे घर साफ

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा :  डोंबिवलीत घर स्वच्छतेसाठी आलेल्या मोलकरणीसह तिच्या जोडीदारणीने घरातील दिव्यांग महिलेला अंधारात ठेऊन कपाटात ठेवलेल्या 40 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज लांबविला. डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील पांडुरंगवाडी भागात ही घटना घडली आहे.

साईज्योती संतोष गवारे (रा. शेलार नाका, डोंबिवली) आणि तिची मावशी गिता (पूर्ण नाव माहीत नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या मोलकरणींची नावे आहेत. या संदर्भात मानपाडा रोडला असलेल्या पांडुरंग वाडीतील पांडुरंग कृपा बिल्डिंगमध्ये राहणारे वैभव विजय पंडितराव (32) यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 3 जून रोजी दुपारच्या सुमारास वैभव पंडित हे औषधोपचारासाठी एमआयडीसीतील एम्स रुग्णालयात गेले होते. त्यांच्या घरात आई एकटी असते. मात्र त्या दिव्यांग (अपंग) आहेत.

वैभव यांच्या घरी शेलार नाका येथे राहणारी त्यांची नेहमीची मोलकरीण मुक्ता गवारे ही त्यादिवशी काही कारणाने येऊ शकली नाही. पंडित कुटुंबीयांची घर स्वच्छतेसंदर्भात अडचण येऊ नये म्हणून मुक्ता गवारे यांनी आपली नात साईज्योती आणि तिची मावशी गीता या दोघींना पंडित यांच्या घरी घर कामासाठी पाठविले. यातील गिता हिने घरातील भांडी घासली, तर साईज्योतीने हिने घरात झाडू मारला. लादी पुसत असताना साईज्योतीने एका खोलीत कुलूप न लावलेले कपाट वैभव यांच्या दिव्यांग आईला कळू न देता हळूच उघडले. कपाटाच्या एका खणातील डब्यात ठेवलेले 40 हजार रुपयांचे दागीने काढून घेतले.

झाडलोट झाल्यावर दोघी चोरलेले दागीने घेऊन निघून गेल्या. वैभव पंडित घरी आले तेव्हा त्यांनी घरातील कपाट तपासून पाहिले. तेव्हा त्यांना डब्यातील सोन्याचे दागीने चोरीला गेल्याचे दिसले. घरात आई असताना कुणीही बाहेरुन आलेले नाही. अशा परिस्थितीत दागीने चोरीला गेल्याने पंडित कुटुंबीयांनी दोघा मोलकरणींवर संशय व्यक्त केला. त्याप्रमाणे ही पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी प्राथमिक तपास करून साईज्योती, गीता या दोघींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button