आमलीपदार्थवरोधी दिन: गेल्या 6 महिन्यात 64 कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्‍त | पुढारी

आमलीपदार्थवरोधी दिन: गेल्या 6 महिन्यात 64 कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्‍त

ठाणे; पुढारी वृत्तसेवा: संतोष बिचकुले मुंबापुरीचे आकर्षण प्रत्येकाला आहे. नाईट पार्ट्या, पब यामध्ये बेधुंद होणार्‍यांचा वेगळाच कट्टा येथे पाहावयास मिळतो. सध्या काही तरुण मुले-मुली, विद्यार्थ्यांचा वाईट वळणाकडे कल जास्त असल्याचे समोर आले आहे. सदर बाब लक्षात घेऊन ‘अमलीपदार्थमुक्‍त मुंबई’ ही विशेष मोहीम हाती घेतलेल्या मुंबई पोलिसांनी जानेवारी ते जून 2022 या कालावधीत 5 हजार 648 कारवाया करून 5982 जणांना अटक केली.

या कारवायांमध्ये तब्बल 64 कोटी 23 लाख 59 हजार 520 रुपयांचा अमलीपदार्थ जप्‍त करण्यात आल्याचे अमलीपदार्थविरोधी विभागाने दै. ‘पुढारी’ला सांगितले.गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अमलीपदार्थ तस्करीचे जाळे वाढत आहे. या जाळ्यात अडकून तरुणपिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. सदर बाब लक्षात घेऊ न मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, पोलीस सह आयुक्‍त (गुन्हे) सुहास वारके यांनी सर्व पोलीस विभागांना अमलीपदार्थ तस्करांवर कारवाया करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यांनी, अमलीपदार्थविरोधी विभागाने व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या बाराही पथकांनी विशेष मोहीम हाती घेतली.

या मोहिमेंतगत गेल्या 6 महिन्यांमध्ये पोलिसांनी एकापेक्षा एक सरस कारवाया केल्या. या कारवायांमध्ये गांजा, कोकेन, एमडी, कोडेएनमिश्रित बॉटल्स, नायट्रावेट टॅबलेट व अन्य अमलीपदार्थ जप्‍त करण्यात आला आहे. या एकूणच कारवायांमुळे मुंबईत पसरत असलेले अमलीपदार्थ तस्करीचे जाळे तोडण्यासाठी पोलिसांना काही प्रमाणात यश आले असून अमलीपदार्थ तस्करी मागच्या मुख्य सूत्रधारांना तुरुंगात धाडण्याच्या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे संबंधित पोलीस विभागांनी दै. ‘पुढारी’ला सांगितले.

नशेत धुंद असलेल्या 5 हजार जणांना बेड्या

विशेष मोहिमेंतगर्त मुंबई पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी गस्ती वाढवल्या आहेत. खबर्‍यांना सक्रिय केले आहे. गस्तीवर असताना अथवा खबर्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाया करून विविध अमलीपदार्थांच्या नशेत धुंद असलेल्या 5 हजार 410 जणांना अटक केली. तसेच अमलीपदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी 572 जणांना अटक केली आहे.

अमलीपदार्थमुक्‍त मुंबई शहरासाठी पोलीस कायम सतर्क असतात. मात्र सुजाण नागरिक या नात्याने प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. आपल्या आजूबाजूला कोणी अमलीपदार्थांचे सेवन अथवा विक्री करत असल्यास स्थानिक पोलिसांशी किंवा 100 नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन जागतिक अमलीपदार्थविरोधी दिनाचे औचित्य साधून नागरिकांना करण्यात येत आहे.
– दत्ता नलावडे,
उपायक्‍त, अमलीपदार्थविरोधी विभाग, मुंबई

Back to top button