डोंबिवली स्थानक परिसर झाले अतिक्रमणमुक्त | पुढारी

डोंबिवली स्थानक परिसर झाले अतिक्रमणमुक्त

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा :  कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने रस्ते अडवून वाहतूक कोंडी आणि पादचार्‍यांची गैरसोय करणार्‍या फेरीवाल्यांवर कारवाईची झोड घेतली आहे. डोंबिवलीत तर स्टेशन परिसरात भाईगिरी करून दहशत माजविणार्‍या परप्रांतीय फेरीवाल्यांची केडीएमसीने गेल्या तीन-चार दिवसांत सलग कारवाया करून हवाच काढून घेतली आहे. फेरीवाल्याचा बुरखा पांघरून डोंबिवलीकरांसाठी डोकेदुखी ठरलेल्या गुंड-गुन्हेगारांची केडीएमसीच्या आक्रमक पावित्र्यामुळे पळापळ झाली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 8/ग प्रभागक्षेत्र कार्यकक्षेतील स्टेशन परिसरामधील ना फेरीवाला क्षेत्रामध्ये दैनंदिन नियमीतपणे फेरीवाले हटविणेची कार्यवाही केली जाते. मात्र गुरूवार ते सोमवार दरम्यानच्या कालावधीमध्ये 16 व 17 जून रोजी ग प्रभाग क्षेत्र कार्यकक्षेतील स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर उपायुक्त स्वाती देशपांडे, प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांच्या मार्गर्शनाखाली अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख राजेंद्र साळुंखे, सहाय्यक पद्माकर शिवलकर, दादासाहेब निकाळजे, रुपेश भोईर, राज गोहिल, कोबाळकर, चींदलिया, रमेश डुंबरे, सुनील वेदपाठक व 13 कर्मचार्‍यांनी कारवाया केल्या.

डोंबिवली स्थानकाबाहेरील या रस्त्यावर दररोज फेरीवाल्यांचे अतिक्रमण असते. मात्र केडीएमसीच्या कारवाईमुळे नागरिकांना मोकळी वाट मिळाली. विनापोलीस बंदोबस्तात कारवाई धोक्याची या कारवाईत 16 हातगाड्या, 25 वजन-काटे आणि कापड माल, प्लास्टिक सामान जप्त करण्यात आले.

डॉ. राथ रोड, पाटकर रोड, उर्सेकरवाडी, मधुबन/पूजा थिएटर गल्लीसह केळकर रोडवर ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली, तर 13 दुकानांचे वेदरशेड निष्कासित केले. कारवाईला स्थानिक फेरीवाले व ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत. अशांचा प्रचंड विरोध झाला होता. मात्र परिस्थीतीला सामोरे जाऊन या पथकाने कारवाई यशस्वी केली. कारवाईसाठी पोलिस बंदोबस्त उपलब्ध झाला नव्हता. मात्र विना पोलिस बंदोबस्तात कारवाई करणे धोक्याचे असल्याचे कारवाईदरम्यान निर्माण झालेल्या परिस्थितीवरून दिसून आले.

Back to top button