काशी एक्स्प्रेसमध्ये ६ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार | पुढारी

काशी एक्स्प्रेसमध्ये ६ वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : काशी एक्स्प्रेसमध्ये ६ वर्षाच्या चिमुरडीवर नराधमाने बलात्कार केला. आपल्या कुटुंबियांसमवेत काशी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या ६ वर्षाची चिमुरडी आणि प्रवासी झोपेत असल्याची संधी साधली. मात्र याचवेळी प्रसंगावधान राखत चिमुरडीच्या आईने सोनू अशोक प्रजापती या नराधमाला पकडून ठेवत कल्याण रेल्वे पोलिसांच्या हवाली केले. गुन्हा मध्य प्रदेश मधील इटारसी स्थानक हद्दीत घडल्याने पोलिसांनी या आरोपीला इटारसी पोलिसांच्या हवाली केले आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रवास सुरक्षित नसल्याचे निदर्शनास आले आहे. (Thane)

पिडीत बालिका १४ फेब्रुवारी रोजी उत्तरप्रदेश मधून काशी एक्स्प्रेसने बदलापूर मधील आपल्या घरी आई, आजी, दोन भाऊ आणि एका बहिणीसह निघाली होती. प्रवासात पहाटेच्या सुमारास चारही मुलाना झोपवून बसलेल्या आईचा डोळा लागला. इतक्यात याच डब्यातून प्रवास करणाऱ्या सोनू प्रजापती या नराधमाने झोपलेल्या ६ वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केला. मुलीच्या ओरडण्याने जागे झालेल्या आईने त्या नराधमाला पकडले. यानंतर जागे झालेल्या इतर प्रवाशांनी देखील त्याला पकडून ठेवत बेदम चोप दिला. (Thane)

पहाटे पासून दुपार पर्यत या चोरट्याला प्रवाशांनी पकडून ठेवले होते. तर त्या महिलेने आपल्या मुलीवर ओढवलेल्या प्रसंगाची माहिती तिच्या बदलापूर येथील घरी असलेल्या वडिलांना दिली. वडिलांनी तातडीने कल्याण रेल्वे पोलीस ठाणे गाठत सदर घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी रेल्वे स्थानकात फिल्डिंग लावली. १४ तारखेला निघालेली काशी एक्स्प्रेस मंगळवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकात पोचताच रेल्वेच्या ३ अधिकारी आणि २० पोलिसांनी गाडीचा ताबा घेत सोनुला ताब्यात घेतले. मात्र या घटने नंतर मेल एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाची सुरक्षा ऐरणीवर आली असून रेल्वे आणि शासनाकडून महिलाच्या सुरक्षेची हमी दिली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र महिलाच्या सुरक्षा अद्यापि अधांतरीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Thane)

हेही वाचलतं का?

Back to top button