डोंबिवली : सुप्रिया शिंदेच्या खुनाला फुटली वाचा; अतिप्रसंगाला कडाडून विरोध केल्याने केला खून | पुढारी

डोंबिवली : सुप्रिया शिंदेच्या खुनाला फुटली वाचा; अतिप्रसंगाला कडाडून विरोध केल्याने केला खून

डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : कल्याण-शिळ (डोंबिवली) मार्गावरील दावडी गावातील सुप्रिया किशोर शिंदे या ३३ वर्षीय विवाहितेचा राहत्या घरात संशयास्पद मृतदेह आढळून आला. घरात कोणी नसल्याने आरोपी विशाल भाऊ घावट (२७, मुळगाव – मुरबाड) याने पुस्तक देण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करत, अतिप्रसंगचा प्रयत्न केला. याला सुप्रिया यांनी कडाडून विरोध केल्याने सुप्रिया यांचा आरोपीने नायलॉन टॅगच्या साह्याने गळा आवळून खून केला. चपलेवरून मारेकऱ्याचा मागोवा काढत, या आरोपीला अटक करण्यात मानपाड पोलिसांना यश आले आहे. न्यायालयाने आरोपीला २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

किशोर शिंदे हे त्याची पत्नी सुप्रियासह, दहा वर्षांच्या मुलासह कल्याण-शिळ मार्गावरील दावडी गावात (डोंबिवली) राहतात. मंगळवारी १५ फेब्रुवारी रोजी किशोर शिंदे नेहमीप्रमाणे ते सकाळी कामावर गेले. तर त्यांचा मुलगा श्लोक हा दुपारी शाळेत गेला होता. किशोर सायंकाळी घरी परतला तेव्हा त्याची पत्नी सुप्रिया घरी नव्हती. त्याने तिचा सर्वत्र शोध घेतला. नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र ती कुठेही आढळून आली नाही. अखेर रात्रीच्या सुमारास किशोर हा पत्नी हरवल्याची तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलिस ठाण्यात गेला. त्याच्यासमवेत अन्य एकजण होता. मात्र सुप्रियाचा मृतदेह घरातच असल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे कळताच, किशोरच्या सोबत असलेल्या सदर इसमाने पोलिस ठाण्यातून काढता पाय घेतला.

सुप्रिया आणि तिच्या पतीचे कुणाशी कसल्याही प्रकारचे वाद नव्हते. तसेच कोणताही सुगावा नसल्याने हत्या कुणी आणि काय कारणासाठी केली, याचे निश्चित कारण समजून येत नव्हते. त्यामुळे सुप्रियाच्या मारेकऱ्याला हुडकून काढण्याचे पोलिसांसमोर कडवे आव्हान उभे ठाकले होते. तपासादरम्यान सुप्रियाच्या शेजाऱ्यांनी तिच्या घराच्या बाहेर अणोळखी चपला आढळल्याची माहिती पोलिसांना दिली. हा धागा पकडून पोलिसांनी त्या चपला कुणाच्या असाव्यात ? याचा शोध सुरू केला. मारेकरी विशिष्ट प्रकारची चप्पल वापरत होता. त्यासाठी विविध चपलांचे फोटो शेजाऱ्यांना दाखविण्यात आले. त्यातून चप्पल निश्चित कोणाची आहे हे निष्पन्न झाले. ही चप्पल शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या विशाल घावट याची असल्याचे समोर आले. यावरून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला.

संशयावरुन आरोपी विशाल भाऊ घावट याला मानपाड पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने केलेल्या कृत्याचा पाढाच वाचला. आरोपींने सुप्रिया हिचा मृतदेह सोफ्यात बंद करून ठेवल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी तपास केला असता, सदर महिलेचा मृतदेह सोफ्यात कोंबलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर गुन्ह्यातील आरोपीला डोंबिवली विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त जय मोरे आणि वरीष्ठ पोलिस निरीक्षक शेखर बागडे याच्या मार्गदर्शनाखाली पकडण्यात पोलिस यंत्रणेला यश मिळाले.

वाचनाच्या छंदातून मारेकऱ्याची जवळीक

मंगळवारी १५ फेब्रुवारी रोजी दुपारी सुप्रियाचा मुलगा श्लोक शाळेत गेला. तर पती कामावर निघून गेले होते. सुप्रियाला वाचनाची प्रचंड आवड असल्याने विशाल हा संधी साधून शिवचरित्र नावाचे पुस्तक देण्याच्या बहाण्याने घरी आला. सुप्रिया घरी एकटीच असल्याने विशालमधील सैतान जागा झाला. एकटीच असल्याचा फायदा घेत, त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुप्रियाने त्याला प्रचंड प्रतिकार केला. आरडाओरडा करून सुप्रिया आपले बिंग फोडील, याची विशालला भीती वाटली. त्यामुळे तिला संपविण्याचा त्याने निर्णय घेतला. विशालने सुप्रियाचे डोके फरशीवर जोरजोरात आदळले. तरीही तिचा मृत्यू होत नव्हता. अखेर त्याने नायलॉनच्या दोन टॅगच्या साह्याने सुप्रियाला गळा आवळून ठार मारले. त्यानंतर तिचा मृतदेह घरातील सोफासेटमध्ये लपवला आणि या सैतानाने तेथून पळ काढला.

हे ही वाचलं का ?

Back to top button