बंगल्याला नोटीस मिळताच राणेंकडून मातोश्रीमधील चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचा ‘प्रहार’! | पुढारी

बंगल्याला नोटीस मिळताच राणेंकडून मातोश्रीमधील चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचा 'प्रहार'!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. किरीट सोमय्या यांच्याकडून हल्लाबोल सुरु असतानाच आता नारायण राणेंकडूनही राजकीय आणि वैयक्तिक ‘प्रहार’ सुरु आहे. या वादात आता आज आणखी एक अध्याय जोडला गेला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करून खासदार विनायक राऊतांना खास बातमी दिली आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, नारायण राणेंकडून खासदार विनायक राऊतांना खास बातमी लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार ?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले होते. त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी लाव रे तो व्हिडिओ करून नारायण राणे यांच्यावर बेनामी संपत्तीचा आरोप केलेला किरीट सोमय्यांचा व्हिडिओ दाखवला होता. त्याचबरोबर नितेश राणे यांनी संघावर तसेच किरीट सोमय्यांवर केलेल्या टीकांचे व्हिडिओही सादर केले होते.

नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्‍याची तपासणी होणार !

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याच्या बेकायदेशीर बांधकामाची तपासणी व केलेल्या बांधकामाचे मोजमाप करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या अंधेरी के-पश्चिम विभागाने नोटीस बजावली आहे. त्यामुळेच शिवसेना व नारायण राणे यांच्यामध्ये पुन्हा एकदा शाब्दिक चकमकी घडणार आहेत.

भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेनेने रणशिंग फुंकले आहे. आमदार नितेश राणे यांनाही मारहाण प्रकरणी अटक झाली होती. आता त्यांच्या जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकामाकडे शिवसेनेने आपले लक्ष केंद्रित केले आहे.

अंधेरी के-पश्चिम विभागाने एक नोटीस गुरुवारी रात्री उशिरा मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 488 अन्वये बजावली आहे. यात के-पश्चिम विभाग आणि इमारत प्रस्ताव विभागाचे पथक शुक्रवारी जुहू तारा रोड येथील अधिश बंगल्याला भेट देऊन बंगल्याची पाहणी करून बेकायदा बांधकामांच्या तक्रारीची पडताळणी करणार असल्याचे कळवले आहे.

हे ही वाचलं का ?

Back to top button