पंढरपूर : तर कल्याणराव काळे यांचा जाहीर सत्कार करू | पुढारी

पंढरपूर : तर कल्याणराव काळे यांचा जाहीर सत्कार करू

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा :  चंद्रभागा सहकारी तथा सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना उभारणीत स्व. वसंतराव काळे यांच्याबरोबरीने माझ्या वडिलांनी खिंड लढवली. पण कल्याणराव काळे यांनी सीताराम कारखाना विकला, असा आरोप राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पवार यांनी केला. काळे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी शेतकरी सभासद, ठेवीदार यांचे पैसे येत्या गुढीपाडव्यापूर्वी द्यावेत. त्यांचा शहरातील शिवाजी चौकात स्वखर्चाने जाहीर सत्कार करू, असे आव्हान त्यांनी दिले.

श्री सीताराम महाराज साखर कारखाना खर्डी (ता. पंढरपूर) च्यावतीने फसवणूक झालेल्या शेतकरी, ठेवीदार, गुंतवणूकदार यांची विचारविनिमय बैठक मंगळवार, 30 रोजी पंढरपूर शहरातील गणेशनाथ महाराज मंगल कार्यालय येथे झाली. त्यावेळी पवार बोलत होते.
अ‍ॅड. पवार म्हणाले, सीताराम कारखान्याच्या माध्यमातून कल्याणराव काळे यांनी 15000 लोकांचे पैसे अगोदर घेतले. 4952 लोकांना शेअर्स दिले.

10000 लोकांचे पैसे हडप केले. या पध्दतीने शेतकर्‍यांची, सभासदांची फसवणूक केली आहे. त्यामुळे कल्याणराव काळे यांनी कुणाचे व किती पैसे घेतले, कधी घेतले व कंपनी कायद्याप्रमाणे 15 टक्के व्याजासह प्रत्येकाचे किती पैसे होतात याची यादी जाहीर करावी. धमक असेल तर प्रत्येक सभासदाला पुढच्या तारखा टाकून चेक देऊन टाका.

तुम्ही 6 महिन्यांत देतो म्हणाला होता. 1 महिना पूर्ण झाला, राहिले 5 महिने. पुढच्या वर्षी 2 एप्रिलला पाडवा आहे. त्यादिवशी तरी किमान सर्वांना चेक देऊन टाका, असे आवाहन करत तुम्हाला बदनाम करण्याचा, त्रास देण्याचा माझा अजिबात हेतू नाही. शेतकर्‍यांचे पैसे द्या, शेतकर्‍यांच्या पैशासाठी लढा उभारला आहे.

ते म्हणाले, एखादी संस्था उभी राहाते तेव्हा त्यातून समाजाला फायदाच होईल, असे वाटत होते. परंतु 8 महिन्यांपूर्वी सीताराम कारखाना विकला. मात्र 2 महिने उलटले तरी लोकांचे पैसे परत दिले नाहीत. तेव्हा लोक मला संपर्क साधून पैसे परत मिळवण्यासाठी मदत मागू लागले आहेत. त्यामुळे मी त्यात भाग घेतला व लढा उभारला आहे.

अ‍ॅड. पवार म्हणाले, मात्र काहींना वाटते मी व माझ्या वडिलांनी संचालक म्हणून काम केले तेव्हा आम्ही का गप्प होतो. पण गप्प तर कधीच नव्हतो. गप्प बसतही नाही. म्हणूनच माझ्या वडिलांना अगोदर व नंतर मला कारखान्यातून बाजूला केले. आम्ही संचालक असताना चंद्रभागेवर केवळ 100 ते 125 कोटींचे कर्ज होते. यावेळी सभासद शेतकर्‍यांना ठिबक सिंचन, खते, बेणे कारखान्यामार्फत मिळायचे, आत तेही मिळत नाही. उलट आज 500 कोटींच्या कर्जाचा डोंगर उभा केला आहे.

ते म्हणाले, सीताराम कारखान्याने गेल्या 20 वर्षांपासून 14 हजार लोकांचे पैसे चंद्रभागेचे सभासद करतो म्हणून घेतले व शेअर्स दिले नाहीत. त्यांना सभासद करा व मैदानात या. बघू कोणाला कुठली जागा मिळते. जोपर्यंत शेतकर्‍यांच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत मी थांबणार नाही.

शेतकरी थेट डीवायएसपी कार्यालयात

श्री सीताराम महाराज साखर कारखान्याकडून ज्या शेतकर्‍यांची, सभासदांची व गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. अशा शेकडो शेतकर्‍यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या कार्यालयात तक्रार घेऊन गेले. डीवायएसपी कदम यांनी शेतकर्‍यांची बाजू ऐकून घेतली. कारखाना संचालकांना नोटीस काढून यावर खुलासा देण्यास सांगितले असल्याचे सांगितले. येत्या दोन दिवसांत नोटिसीची तारीख संपत आहे. मात्र न्यायाच्या बाजूने पोलिस उभे असतील, योग्य ती कारवाई केली जाईल, असे डीवायएसपी कदम यांनी सांगितले.

 

Back to top button