नौदल सामर्थ्याला नवी बळकटी

नौदल सामर्थ्याला नवी बळकटी
Published on
Updated on

आयएनएस विशाखापट्टणम या युद्धनौकेमुळे भारतीय नौदलाचे ( नौदल ) बळ वाढले आहे. ही क्षेपणास्त्रवाहू युद्धनौका असून, टेहळणीसाठीही अत्याधुनिक यंत्रणा तैनात केली आहे. एकाच वेळी दोन हेलिकॉप्टर उतरविण्याची व्यवस्था असणारी ही युद्धनौका भारताला विकसित देशांच्या पंक्तीत नेणारी आहे.

आयएनएस विशाखापट्टणम ही युद्धनौका नौदलाच्या ( नौदल ) ताफ्यात समाविष्ट झाल्यामुळे भारतीय नौदलाच्या युद्ध क्षमतेत मोठी वाढ झाली आहे. 'प्रोजेक्ट-15 बी'मधील ही पहिली स्टिल्थ गायडेड मिसाईल विनाशिका आहे. नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंह यांनी युद्धनौका क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे उत्तम उदाहरण म्हणून या विनाशिकेचे स्वागत केले. 'वेला' ही पाणबुडीही नौदलाच्या ताफ्यात सामील झाली. याखेरीज पुढील महिन्यात 'संध्याक' ही टेहळणी नौकाही नौदलात सामील होत आहे. आयएनएस विशाखापट्टणम ही क्षेपणास्त्रभेदी युद्धनौका असून, ती ब्राह्मोस-बराक यासारख्या अतिविध्वंसक क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे. जमिनीवरून जमिनीवर आणि जमिनीवरून हवेत मारा करणार्‍या सुपरसोनिक क्षेपणास्त्रांसह मध्यम आणि कमी पल्ल्याच्या तोफा, अँटी सबमरीन रॉकेट, अ‍ॅडव्हान्स इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि कम्युनिकेशन सूट अशा अनेक वैशिष्ट्यांनी ही युद्धनौका युक्त आहे.

आयएनएस विशाखापट्टणम या विनाशिकेचे वैशिष्ट्य असे की, शत्रूचे विमान दिसताक्षणी विमानभेदी क्षेपणास्त्र डागून ती ते नष्ट करू शकते. ही युद्धनौका पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने तयार झाली आहे. 74 हजार टन वजनाच्या या जहाजाची लांबी 535 फूट असून, ते तासी 56 किलोमीटर वेगाने धावू शकते. जेव्हा हे जहाज कमी वेगाने चालत असते तेव्हा त्याच्या मारक क्षमतेच्या टप्प्यात 7400 किलोमीटरचे क्षेत्र येते. म्हणजेच विशाल सागरी क्षेत्रात नौदलाच्या सैनिकांची आता चौफेर करडी नजर राहील. भारतीय नौदलाजवळ आणखीही अनेक युद्धनौका आहेत; परंतु आयएनएस विशाखापट्टणम हे अत्याधुनिक सुविधांनी युक्त आणि कालानुकूल जहाज आहे. बरीच खास वैशिष्ट्ये असलेली ही युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील होणे गर्वाची गोष्ट तर आहेच, शिवाय भारताची सागरी युद्ध क्षमता यामुळे जगाला समजून चुकली आहे.

भारताकडे सद्यःस्थितीत 13 पाणबुड्या ( नौदल ) आहेत. या पाणबुड्या रशिया आणि जर्मनीत तयार झालेल्या आहेत. देशात तयार झालेली 'अरिहंत' ही पहिली आण्विक ऊर्जेवर चालणारी पाणबुडी यापूर्वीच नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाली आहे. नौदलप्रमुखांच्या म्हणण्यानुसार, सध्या 41 पैकी 39 युद्धनौका आणि पाणबुड्या तयार करण्याचे काम भारतीय शिपयार्डला दिले आहे. म्हणजेच भारतीय नौदलाला मजबूत बनविण्यासाठी मोठी तयारी सुरू आहे.

दक्षिण चीन समुद्रातील चिनी बेटांचे लष्करीकरण केले जात आहे. या कृतीला जगभरातून विरोध होत आहे. या क्षेत्राबाबत पूर्व आणि आग्नेय आशियातील अनेक देशांचे विविध दावे आहेत. या पातळीवर शक्तिसंतुलनासाठी आयएनएस विशाखापट्टणमसारख्या युद्धनौकेची ( नौदल ) भारताला गरज होतीच. लष्करी महत्त्वाबरोबरच जागतिक अर्थव्यवस्थेसाठीही भारताचे सागरी क्षेत्र महत्त्वाचे आहे. आजमितीस सुरक्षेच्या कारणास्तव, सीमावादांमुळे आणि सागरी प्रभुत्व कायम राखण्यासाठी जगभरातील देश आपल्या लष्करी ताकदीत वाढ करीत असून अधिकाधिक आधुनिक प्रणालींचा स्वीकार करत आहेत. अशा पार्श्वभूमीवर भारताने सागरी शक्तीच्या बाबतीत संपन्न देशांच्या बरोबरीने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.

आयएनएस विशाखापट्टणम जहाजाच्या ( नौदल ) निर्मितीचा खर्च 29,600 कोटी रुपये इतका आहे. युद्धनौकेत 'ब्राह्मोस'मध्ये हे क्षेपणास्त्र वाहून नेण्याची क्षमता आहे. रशिया आणि भारताच्या संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थांनी एकत्रितपणे तयार केलेले हे क्षेपणास्त्र आहे. याखेरीज आयएनएस विशाखापट्टणममध्ये 33 बराक, 8 दीर्घ पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे असतील. ही क्षेपणास्त्रे भारत आणि इस्रायलने मिळून तयार केली आहेत. 162 मीटर लांबीच्या या जहाजात आणखी एक इस्रायल बनावटीचे उपकरण आहे. ते आहे मल्टिफंक्शन सर्विलान्स थ्रेट अलर्ट रडार (एमएफ-एसटीएआर). ही प्रणाली बराक क्षेपणास्त्राला लक्ष्याची माहिती उपलब्ध करून देईल.

मशिनरी कम्पार्टमेंट व्यतिरिक्त या युद्धनौकेत टोटल अ‍ॅटमॉस्फिअर कंट्रोल सिस्टिमसुद्धा आहे. या प्रणालीच्या मदतीने जहाजावरील सैनिक जैविक आणि रासायनिक युद्धाच्या वातावरणातही जहाजाचे रक्षण करू शकतील. परंतु, त्यासाठी कर्मचार्‍यांना विशेष सूट आणि मास्क वापरणे आवश्यक असेल. 7300 टन वजनाच्या या जहाजाच्या पुढील भागात 630 क्लोज ईन वेपन सिस्टिमसुद्धा बसवली आहे. या जहाजात स्वदेशी बनावटीचे ट्विन ट्यूब टॉर्पिडो लाँचर्स आणि रॉकेट लाँचर्सही आहेत. पाणबुडीपासून संरक्षण करण्याची जहाजाची क्षमता यामुळे वाढते. याखेरीज शिप डेटा नेटवर्क (एसडीएऩ), ऑटोमॅटिक पॉवर मॅनेजमेंट सिस्टिम (एपीएमएस), कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टिम (सीएमएस) आणि इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टिम (आयपीएमएस) आदी प्रणालींनी हे जहाज युक्त आहे. या युद्धनौकेत जे टर्बाइन आहे, ते यूक्रेनमध्ये बनवले आहेत. हे झोया गॅस टर्बाइन आहेत. या जहाजावर हेलिकॉप्टर व्यवस्थितपणे उतरविण्याच्या दृष्टीने रेल लेस हिलो ट्रेवर्सिंग सिस्टिमसुद्धा बसवली आहे. त्याच्या मदतीने हे जहाज एकाच वेळी दोन वेगवेगळ्या भूमिका पार पाडत असलेल्या हेलिकॉप्टर्सची हाताळणी मोहीम काळात करू शकेल. आयएनएस विशाखापट्टणम ही 65 टक्के स्वदेशी बनावटीची नौका आहे आणि यातील 11 शस्त्रास्त्रे आणि 6 सेन्सर प्रणालीही भारतीय बनावटीच्या आहेत.

सागरी सीमांचा विचार करता भारताला दोन बाजूंंनी धोका आहे. एकीकडे पाकिस्तानचे ग्वादार बंदर चीनने ताब्यात घेतले आहे, तर दुसरीकडे दक्षिण चीन समुद्रात जाण्याचा मार्ग बंगालच्या उपसागरातूनच जातो. चीनचे व्यापारी धोरणही विस्तारवादी आहे आणि जगभरात चिनी वस्तू पोहोचविण्यासाठी चीनला हिंदी महासागराचा मार्ग वापरावा लागतो. या दृष्टीने बंगालच्या उपसागरातील अनेक बंदरे विकासाच्या नावाखाली चीनने ताब्यात घेतली. त्यात म्यानमार आणि श्रीलंंकेतील बंदरांचा प्रामुख्याने समावेश आहे. या बंदरांच्या विकासाचा खर्च एवढा अवास्तव आहे की, हे देश चीनच्या कर्जाखाली दबले गेले आहेत. श्रीलंकेतील बंदर चीनने 99 वर्षांच्या करारावर ताब्यात घेतले आहे. ही सर्व परिस्थिती पाहता भारताला सागरी ताकद वाढविणे अत्यावश्यक झाले आहे. आयएनएस विशाखापट्टणमसारखी सुसज्ज युद्धनौका या ताकदीची जाणीव चीनसह संपूर्ण जगाला करून देईल, यात शंकाच नाही.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन, निवृत्त

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news