Jayant Singh Chaudhary : उत्तर प्रदेशमधील हा नेता ठरला ‘राज ठाकरे’; विधानसभा निवडणुकीत भवितव्य पणाला…

Jayant Singh Chaudhary : उत्तर प्रदेशमधील हा नेता ठरला ‘राज ठाकरे’; विधानसभा निवडणुकीत भवितव्य पणाला…
Published on
Updated on

राजकारणात घराणेशाही ( Jayant Singh Chaudhary ) असली तरी सर्वकाही वारशावर मिळते असे नाही. प्रचंड बेभरवशी असलेल्या या क्षेत्रात सध्या उत्तर प्रदेशातील एक तरुण आपले नशीब आजमावत आहे. आजोबा देशाचे माजी पंतप्रधान, वडील अनेकदा केंद्रीय मंत्री तरीही त्‍यांना पक्षाची वाताहात काही रोखता येत नाही. महाराष्ट्रात राज ठाकरे यांनी धडाक्यात सुरू केलेला राजकीय प्रवास जसा अडखळत सुरू आहे. तसाच काहींसा राजकीय प्रवास उत्तर प्रदेशातील राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष जयंतसिंग चौधरी यांचा सुरू आहे. ते उत्तर प्रदेशातील राज ठाकरे का ठरले? चला जाणून घेवूया…

केंद्रात अनेक वर्षे मंत्री असलेले चौधरी अजित सिंग यांचे पुत्र असलेले जयंत सिंग यांनी आता समाजवादी पक्षाशी आघाडी केली आहे. कधीकाळी आजोबा पंतप्रधान असताना संपूर्ण उत्तर प्रदेशावर राज्य करणारे चौधरी घराणे आता राजकीय अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे.

चौधरी चरण सिंग यांनी यांनी शेतकऱ्यांची मोट बांधत आपले राजकीय अस्तित्व सिद्ध केले. ते देशाचे पाचवे पंतप्रधान झाले. त्यांच्यानंतर चौधरी अजित सिंग यांनी राजकीय जीवनात प्रवेश केला. अमेरिकेत इंजिनीअर असलेले अजित सिंग भारतात आले. राजकारणात उतरले. मात्र, संपूर्ण राजकीय जीवनात बेभरवशी राजकीय व्यक्तिमत्व म्हणूनच ते ओळखले गेले. नेहमी सत्तेच्या बाजूने जात ते सत्ता उपभोगत राहिले आणि अखेरीस जनमत हरवून बसले. त्याचा फटका आता जयंत सिंग चौधरी यांना बसत आहे.

उत्तर प्रदेशातील राजकारणात बडे चौधरी नावाने ओळखले जाणारे चरण सिंग यांनी जाती पातीपलिकडे जावून शेतकऱ्यांची मोट बांधली. ज्या प्रदेशात जातीवर आधारित अनेक गोष्टी घडत असताना केवळ शेतकरी हीच जात आहे, असे बिंबवण्यात ते यशस्वी झाले होते. ही व्होट बँक त्यांची ताकद बनत गेली. उत्तर प्रदेशच नव्हे तर हिंदी पट्ट्यातील सर्वाधिक जनाधार असलेला नेता बनले. मात्र, छोटे चौधरी नावाने ओळखले जाणारे अजित सिंग हा जनाधार टिकवू शकले नाहीत. त्यांनी आपली ओळख शेतकरी नेत्याऐवजी जाट नेता, अशी तयार केली. जातीपातीच्या राजकारणात ते निवडणुका जिंकत होते. ते वेगवेगळ्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये मंत्री होते.

Jayant Singh Chaudhary : बेभरवशी राजकारणाचा फटका

राष्ट्रीय लोकदल २००० नंतर नेहमी कुठल्या कुठल्या राष्ट्रीय पक्षांशी आघाडी करत आला आहे. चौधरी जयंत सिंग यांच्या पक्षाने २००२ मध्ये भाजपशी आघाडी केली त्यावेळी केवळ २ टक्के मते घेत १४ विधानसभेच्या जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर २००७ च्या निवडणुकीत स्वतंत्र लढत १० जागा जिंकल्या मात्र, त्यावेळी या पक्षाला ४ टक्के जागा मिळाल्या. २०१२ च्या निवडणुकीत आरएलडीने काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि ९ जागांवर विजय मिळविला. त्यावेळी त्यांचे मताधिक्य घटत २ टक्क्यांवर आले. यावेळी त्यांनी राज्यात हातमिळवणी करण्याबरोबरच केंद्रात मंत्रिपद मिळविले. त्यावेळी अजित सिंग यांना नागरी उड्डयन मंत्री करण्यात आले. २०१७ मध्ये भाजपच्या लाटेत आरएलडीचा पुरता धुरळा उडाला. त्यांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. मात्र, २ टक्के मते मिळाली.

पूर्वांचलवरील पकड सैल

मुजफ्फरनगर, मिर्झापूर, पूर्वांचलमध्ये जाट आणि मुस्लिम मते निर्णायक ठरतात. २०१३ मध्ये मुजफ्‌फरनगर येथे झालेल्या जातीय दंगलीनंतर येथील समीकरणे बदलत गेली. संपूर्ण राज्यात त्याचे पडसाद उमटले. जाट मते ही अजित सिंग यांची व्होट बँक मानली जात होती. शेतकरी आणि अन्य घटक नेहमी चौधरींच्या बाजुने होते. मात्र, भाजपने त्यावर पकड जमवली. २०१४ च्या निवडणुकीत अजित सिंग आणि जयंत चौधरी या दोघांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. जाट मते भाजपकडे वळल्याचा तो परिणाम होता. बदलत्या परिस्थितीत शेतकरी आंदोलनामुळे जाट समुदाय भाजपवर नाराज आहे. याचा फायदा घेण्याचा प्रयत्न चौधरी जयंत सिंग करत आहेत. त्याचा कितपत फायदा होतो हे निवडणुकीनंतर कळेल.

jayant choudhari यांना एकाच निवडणुकीत यश

आजोबा आणि वडिलांचा मोठा वारसा असलेले जयंत केवळ एकदाच लोकसभा निवडणूक जिंकू शकले आहेत. मथुरा लोकसभा मतदारसंघातून ते खासदार होते. २०१४ मध्ये हेमामालिनी यांनी त्यांचा तीन लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. तर २०१९ मध्ये मुंबईचे पोलिस आयुक्त राहिलेले सत्यपाल सिंग यांनी २३ हजार मतांनी पराभूत केले होते.

राज ठाकरे यांच्याशी का केली जाते तुलना ?

राज ठाकरे आणि जयंत चौधरी यांच्यात साम्य आहे. राज ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे पुतणे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे सूत्रे आली. जयंत यांच्याबाबत तसा प्रश्न उभा राहिला नाही. मात्र मनसे आणि रालोद यांच्यात साम्य आहे. २००६ ला राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून मनसे स्थापन केली. त्यानंतर २००९ च्या निवडणुकीत तब्बल १३ आमदार निवडून आणले. २०१४ च्या निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजपला पाठिंबा दिला. त्यावेळी चित्र पालटले आणि केवळ १ आमदार निवडून आला. २०१९ मध्ये मनसेने भाजपशी फारकत घेत निवडणूक लढविली. त्यावेळीही एक आमदार निवडून आला हाेता. असाच काहीसा राजकीय प्रवास जयंत सिंग चाैधरी यांचा आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news