सातारा; पुढारी वृत्तसेवा : सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे सातवाहनकालीन जातं कराड येथील कृष्णा नदीच्या काठावर असणार्या शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या आवारात आढळून आले आहे. कला व वाणिज्य महाविद्यालय, सातारा येथील प्रा. गौतम काटकर आणि मानसिंगराव कुमठेकर यांना मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या माध्यमातून कराड शहराच्या अभ्यासादरम्यान हे जातं मिळाले आहे. ते वैशिष्ट्यपूर्ण असून त्यावरून दक्षिण महाराष्ट्राच्या सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या इतिहासावर प्रकाश पडणार आहे.
दक्षिण महाराष्ट्राला मोठा प्राचीन इतिहास आहे. या इतिहासाच्या पाऊलखुणा या जिल्ह्यातील विविध गावांत आढळून येतात. कोल्हापूर, मिरज आणि कराड ही या भागातील प्रमुख शहरं. या तिन्ही शहराजवळ बौद्ध लेणी आढळून आली आहेत. तत्कालीन प्राचीन व्यापारी मार्गावरील ही गावे होत. मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने गेली काही वर्षे या भागातील ऐतिहासिक अवशेष, कोरीव लेख यांचा शोध घेतला जात आहे. या अभ्यासादरम्यान नुकतेच मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांना कराड येथे कृष्णानदीच्या काठावर असलेल्या डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयाच्या आवारात सातवाहनकालीन जातं आढळून आलं आहे.
प्राचार्य डॉ. सतीश घाटगे आणि इतिहास विभागाचे प्रा. सचिन बोलाईकर यांच्या सहकार्याने या जात्याचा अभ्यास करण्यात आला. साळुंखे महाविद्यालय हे कृष्णा नदीकाठी ज्या भागात आहेत, तो भाग कराड शहराचा सर्वांत जुना भाग आहे. या परिसरात आजवर अनेक अवशेष मिळाले आहेत. साळुंखे महाविद्यालयाच्या आवारात मिळालेले अवशेष एकत्र ठेवण्यात आले आहेत. मात्र, त्यांचा अभ्यास झाला नव्हता. या अवशेषांमध्येच सातवाहन कालीन जाते आढळून आले आहे. हे जाते सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचे असावे. सुमारे तीन फुट परिघाच्या या जात्याला असलेल्या छिद्रातून लाकडी दांडकं घालून ते फिरवलं जात असे. अशी जाती काही दिवसांपूर्वी जुन्नर आणि उस्मानाबाद परिसरातही आढळली आहेत.
प्राचीन इतिहास लाभलेल्या या शहरातील कृष्णा नदीच्या काठावर सातवाहनकालीन जातं मिळालं आहे. त्यामुळे या ठिकाणी सातवाहनकालीन वस्ती असल्याचे सिध्द होते. साळुंखे महाविद्यालयाच्या आवारात वीरगळ, जुन्या मंदिरांचे अवशेष, जुने पाटा- वरवंटा, असे अन्य अवशेषही आहेत. त्यांचा अभ्यासही मिरज इतिहास मंडळाचे अभ्यासक करत आहेत. त्यावरून कराड शहराच्या प्राचीन इतिहासाच्या पाऊलखुणा उलगडणार आहेत.