kolhapur rukadi crime : रुकडीतील वृद्धेच्या खूनप्रकरणी मुलगा, सुनेसह सहाजणांवर गुन्हा | पुढारी

kolhapur rukadi crime : रुकडीतील वृद्धेच्या खूनप्रकरणी मुलगा, सुनेसह सहाजणांवर गुन्हा

हातकणंगले : पुढारी वृत्तसेवा : kolhapur rukadi crime : रुकडी येथील हिराबाई गणपती नाईक या वृद्धेचा खून झाल्याचे पाच महिन्यांनंतर पोलिस तपासात मंगळवारी उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी वृद्धेच्या मुलासह सून, नातू आणि नातसुना अशा सहा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल केला आहे. याबाबत वृद्धेचा नातू राजू अशोक शिंदे यांनी न्यायालयात दाद मागितली होती.

दरम्यान, यातील फिर्यादी राजू अशोक शिंदे याच्यावरही तीन लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची वर्दी वृद्धेचा मुलगा महादेव गणपती नाईक (वय 68, रा. रुकडी) यांनी दिली आहे.

kolhapur rukadi crime : सहाजणांवर गुन्हा दाखल

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये वृद्धेचा मुलगा महादेव गणपती नाईक, सून अलका महादेव नाईक, नातू दीपक महादेव नाईक, त्याची पत्नी ज्योती दीपक नाईक, नातू सुशील महादेव नाईक, त्याची पत्नी लक्ष्मी सुशील नाईक (सर्व रा. रुकडी, ता. हातकणंगले) यांचा समावेश आहे.

हिराबाई नाईक या 12 जुलै रोजी सकाळी घरातच मृतावस्थेत आढळून आल्या होत्या.

त्यानंतर त्यांचा नातू राजू शिंदे (रा. रुकडी) याने त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून, अनैसर्गिक झाला आहे.

याचा तपास करून दोषींवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी फिर्याद जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केली होती.

त्यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. बी. रेडकर यांच्या न्यायालयात सुनावणी होऊन न्यायाधीशांनी वृद्धेच्या मृत्यूविषयी तपास करून तीन महिन्यांत याबाबतचा अहवाल सादर करावा, असा आदेश हातकणंगले पोलिसांना दिला होता.

उपाशी ठेवून छळ, केस कापून विटंबना

तपासाअंती वृद्धेला संशयितांनी उपाशी ठेवून शिवीगाळ करीत मारहाण केली.

खून करण्यापूर्वी संशयितांनी वृद्धेला घरात कोंडून ठेवून तिचे केस कापून विटंबना केली.

तिच्या नावे असलेल्या प्रॉपर्टीची नोटरी करून घेतल्याचे निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी वृद्धेच्या मुलासह सून, नातू आणि नातसुना अशा सहा संशयितांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला.

Back to top button