सोलापूर : फक्‍त फ्रूट बीअर विक्रेते टार्गेट; निर्मिती केंद्रे सुरक्षित | पुढारी

सोलापूर : फक्‍त फ्रूट बीअर विक्रेते टार्गेट; निर्मिती केंद्रे सुरक्षित

सोलापूर ः जगन्नाथ हुक्केरी

कमी पैशात यथेच्छ नशा करण्याची ख्याती सोलापूरच्या फ्रूट बीअरने कमावली आहे. यामुळेच हातभट्टी आणि ताडीची जागा याच नशिली पदार्थाने घेतली आहे. अन्‍न, औषध प्रशासनाच्या कृपायुक्‍त व मेहरबान धोरणामुळे दिवसेंदिवस याचा बोलबाला वाढत आहे.कारवाईचे नाटक करत फ्रूट बीअरच्या विक्री केंद्रांवर कारवाई करण्यात येते आणि उत्पादन, निर्मिती केंद्रांना चक्क अभयच देण्यात येत असल्याने ते मात्र कायमस्वरुपी सुरक्षित आहेत.

राज्य उत्पादन शुल्क आणि अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई संशोधनात्मकच असतात. एकातून सुटलेली ही फ्रूट बीअर दुसर्‍या विभागाच्या कृपाळू नजरेत भरत आहे. यामुळे ‘आले साहेबाच्या मना…’ याच हिशोबाने याकडे पाहिले जाते. तोपर्यंत बनवणारे बनवून आणि कमवूनही, तर पिणारे मरुन मोकळे होतात.

अन्‍न, औषध प्रशासन विभागही या धंद्याला बळाचेच ‘औषध’ पाजत राहिल्याने दिवसेंदिवस याचा हा बाजार तेजीतच आहे. फ्रूट बीअरने आपली हद्द सोडून ग्रामीण भागातही हातपाय पसरत आहे. ताडीने तर फारच राडा केला. हातभट्टीने कट्टी केल्याने आता फ्रूट बिअरचा फेस फसफसत आहे. त्याच्यावर अन्न व औषध प्रशासनाने मेहरबान होत गुटख्याप्रमाणेच प्रेम व्यक्‍त केले आहे. यामुळे टपर्‍याटपर्‍यांमध्ये विकणार्‍या गुटख्याला जसे स्वातंत्र्य मिळाले, तसे फ्रूट बीअरला पावलोपावली आणि मिळेल त्याठिकाणी विक्रीसाठी जागा मिळाली आहे.

मुळात किंमत कमी असल्याने पोलिसांनी कारवाई केली, तर फारसे नुकसानही होत नाही. झाली तर पाचशे-हजारांच्या बाटल्या जप्‍त केल्या जातात. विकणार्‍यांवर एखादा गुन्हा दाखल होतो. जागा दुसर्‍याची, विकणारा दुसराच, गुन्हाही दुसर्‍यावर दाखल होतो आणि अटक, शिक्षा या गोष्टी कोसोदूर असून, सडक्या फळातून फसफसणार्‍या बीअरमधून कमवून तेही गबरगंडच होत आहेत. अन्यत्रची कारवाई थांबल्यानंतर पोलिसांचे लक्ष मात्र गुटखा, फ्रूट बीअर, ताडी, हातभट्टीकडे वळते.

पोलिसांच्या पावलावर पाऊल ठेवत अन्‍न, औषध प्रशासन विभाग कारवाईचे नाटक करते, हे आजपर्यंतच्या कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे. पावलोपवली खुलेआम सुरु असणार्‍या फ्रूट बीअर उत्पादन केंद्रांवर कारवाई न करता फक्‍त विक्री केंद्रांवरच का कारवाई केली जाते, असा प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

घातक क्‍लोरोफॉर्मचा अनियंत्रित वापर

फ्रूट बीअर बनवताना आंबवण्यासाठी इस्टसह अन्य रसायनांचा वापर केला जातो. यात क्‍लोरोफॉर्मचाही अनियंत्रित वापर करण्यात येत आहे. हे गुंगी आणणारे असल्याने शुद्धीहारक म्हणून शस्त्रक्रियेपूर्वी याचा वापर केला जातो. त्याच्या अतिवापरामुळे चयापचयात्मक (शरीरात सतत होणार्‍या भौतिक-रासायनिक बदलांमध्ये) विकृती होतात. हृदय, यकृत व मूत्रपिंडास इजा होते. यामुळे हे मानवी आरोग्यासाठी फारच धोकादायक आहे.

मेंदूसह आरोग्यावर विपरित परिणाम

क्‍लोरोफॉर्मचा विद्रावक, रंजक आणि औषधनिर्मितीत रासायनिक मध्यस्थ म्हणून, तर कृमीनाशक, वेदनाहारक चोळण्याच्या औषधात अंगग्रहरोधक (स्नायूच्या अनैच्छिक तीव्र आकुंचनाला रोध करणार्‍या) औषधांमध्ये याचा वापर केला जातो. यामुळे वेदना कमी होतात. याच्या अतिसेवनाने मेंदूसह संपूर्ण आरोग्यावर विपरित परिणाम होतो. स्मृती जाण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्‍त केली आहे.

हेही वाचलं का?

Back to top button