IFFI Film : दिग्दर्शक निखिल महाजन यांना विशेष ज्युरी रौप्य मयूर पुरस्कार | पुढारी

IFFI Film : दिग्दर्शक निखिल महाजन यांना विशेष ज्युरी रौप्य मयूर पुरस्कार

पणजी; पुढारी वृत्‍तसेवा

IFFI Film मराठी चित्रपट ‘गोदावरी’ ला दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. निशिकांत कामत यांच्या भूमिकेसाठी अभिनेता जितेंद्र भिकुलाल जोशी यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा रौप्य मयूर पुरस्कार तर दिग्दर्शक निखिल महाजन यांना विशेष ज्युरी रौप्य मयूर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे ५२, बाजी, गोदावरी या विविध जॉनरच्या सिनेमांचा अष्टपैलू दिगदर्शक, सिनेमा आणि पुस्तक दोन्हींमध्ये समोरच्याला खिळवून ठेवणारा लेखक, गंभीर मुद्रा पण हजरजबाबी स्वभावाचा माणूस, जोपर्यंत स्वतःच्या मनाला पटत नाही, तोपर्यंत दिग्दर्शनाकडे न जाणारा चित्रपट निर्माता निखिल महाजन यांच्याशी झालेल्या खास गप्पांचे हे इतिवृत्त…

प्रश्न – गोदावरी सिनेमाचा दिगदर्शक आणि लेखक म्हणून काय अनुभव होता?

उत्तर – गोदावरी हा खूप जवळचा सिनेमा आहे. निशिकांत कामत यांच्या आठवणीत त्यांनाच समर्पित केलेला हा सिनेमा आहे. विक्रम गोखले, संजय मोने, नीना कुलकर्णी यासारखे दिग्ग्ज, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, जितेंद्र जोशी, सखी गोखले हे सगळेच अनुभवी कलाकार चित्रपटात होते. दिगदर्शक म्हणून हा अनुभव मलाही बरच काही शिकवणारा होता. आतापर्यंत मी हॉरर, थ्रिलर असे लेखन केले आहे. अशाप्रकारचे भावनिक व कौटुंबिक नाट्य लिहिण्याचा तसा हा पहिलाच अनुभव होता. यामध्ये माझा सहलेखक प्राजक्त देशमुख याची खूप मदत झाली. विशेषतः नाशिकच्या बोलीभाषेतले संवाद त्याने खूप उत्तम लिहिले. अनुभव अतिशय संपन्न करणारा होता.

प्रश्न – २०१३ साली पुणे ५२, २०१५ ला बाजी आणि २०२१ ला गोदावरी चित्रपटांमध्ये एवढा गॅप घेण्यामागे काही विशेष कारण?

उत्तर – विशेष काही कारण असे नाही. मी खूप गोष्टी ऐकत असतो. पण जोपर्यंत एखादी गोष्ट मला भावत नाही तोपर्यंत मी ती दिगदर्शित करत नाही. दरम्यान मी लिहितो, निर्मिती करतो. मी काहीतरी करत असतो. पण यावेळी मी एवढा मोठं गॅप घेणार नाही. दोन वर्षांनी रावसाहेब नावाचा सिनेमा घेऊन येणार आहे.

प्रश्न – सिनेमा नदीच्या काठावर राहणाऱ्या माणसांच्या आयुष्याभोवती फिरतो, तुझं आणि नदीचं काही खास नातं?

उत्तर- मी औरंगाबादमध्ये मोठा झालो आहे. तिथे खाम नदी आहे. ती नदी आहे हे मला खूप उशिरा समजले. आम्ही तिला नालाच समजत होतो. पण या नद्या आपल्या जीवनवाहिन्या आहेत. गोदावरीच्या निमित्ताने मी नाशिक मध्ये गोदावरीतीरी गेलो होतो. आता मी नेहमी त्या नदीवर जातो. आपण यांचे संवर्धन केले पाहिजे.

प्रश्न – सिनेमामध्ये क्लोज शॉट खूप आहेत, त्याचे काही विशेष कारण?

उत्तर – सिनेमामध्ये नायक नायिका कमी बोलतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव, त्यांचे डोळे अधिक बोलतात. मला ते लोकांना दाखवायचे होते. डोळ्यांची भाषा खूप बोलकी असते.

प्रश्न – सिनेमा गंभीर जॉनरचा आहे, तो पाहताना अनेक प्रसंग अंगावर येतात, दिगदर्शन करत असताना तुझ्या लक्षात एखादा अनुभव

उत्तर – असा एखादा अनुभव सांगितला तर सिनेमाची मजा राहणार नाही. असे प्रसंग बरेच आहेत. पण त्याहीपेक्षा महत्वाचे या सर्व कलाकार तंत्रज्ञांचे प्रेम आहे. या सिनेमाचे बजेट खूप कमी होते. पण माझ्या एका शब्दावर सगळे कलाकार आले. मंधानाबाबत काहीही विचारणा नाही. प्रियदर्शन जाधव तर संपूर्ण प्रक्रियेत उभा होता. हा अनुभव खूप भावनावश करणारा होता.

प्रश्न – लेखन, दिगदर्शन, निर्मिती या शिवाय अभिनय करण्याचा काही विचार आहे का?

उत्तर – ठाकरे सिनेमात एक भूमिका मी केली आहे. पण मला असे वाटते की मी अभिनय करू नये. दोन प्रसंगांच्यावर आपण तिसरा प्रसंग करू शकत नाही याची जाणीव झाली आहे. त्यामुळे तसा काही विचार नाही.

प्रश्न – गोदावरी बनवत असताना तो जागतिक पातळीवर जाईल असे वाटले होते का? सुवर्ण मयूर स्पर्धेत सिनेमा आहे त्याबद्दल काय भावना आहेत?

उत्तर – खरंतर अजिबात असे काहीच वाटले नव्हते. पण विविध ठिकांणांवर सिनेमाला जे प्रेम मिळते आहे. त्याने भारावून गेलो आहे. जागतिक स्पर्धेत मी वसंतराव हा मराठी सिनेमाही आहे. ते ही मित्रच आहेत. पुरस्कार बक्षीस कुणालाही मिळाले तरी आनंद आहे.

Back to top button