विदेशी अत्याधुनिक यंत्रमाग आणण्याकडे वाढता कल | पुढारी

विदेशी अत्याधुनिक यंत्रमाग आणण्याकडे वाढता कल

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : देशातील प्रमुख वस्त्रोद्योग केंद्रांमध्ये गणल्या जाणार्‍या सोलापुरात विदेशी अत्याधुनिक लूम्स आणण्याचे प्रमाण वाढतच आहे. जागा व कामगार तुटवड्यावर उपायाबरोबरच उत्पादन क्षमतेत वाढ, असे यंत्रमागाचे फायदे आहेत.

सोलापूरच्या वस्त्रोद्योगात चादर-टॉवेल्सची निर्मिती होते. ही उत्पादने जगप्रसिद्ध आहेत, हे सर्वश्रुत आहे. पारंपरिक यंत्रमागांवर वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने उत्पादन ही सोलापूरची खासियत आहे. काळाच्या ओघात सर्वच समीकरणे बदलली. याअंतर्गत उद्योगधंद्यांमध्ये काळानुरूप बदल होणे अपेक्षित होते; पण सोलापूरच्या वस्त्रोद्योगात सुरुवातीच्या काळात बदल न स्वीकारता पारंपरिकता जपण्यातच धन्यता मानली. परिणामी, अनेक प्रश्न उद्भवले.

कामगार तुटवडा ही प्रमुख समस्या

वस्त्रोद्योेगाला गत अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. कामगारांची नवीन पिढी सामाजिक सुरक्षेअभावी या क्षेत्रात येण्यास उत्सुक नाही. या पार्श्वभूमीवर आधुनिकीकरणाशिवाय तरणोपाय नाही, हा मंत्र हेरत वस्त्रोद्योगाने उशिरा का होईना यामध्ये पाऊल टाकण्यास सुरुवात झाली. सुमारे 25 वर्षांपूर्वी चीन, युरोप बनावटीचे अत्याधुनिक यंत्रमाग आणण्यास सुरुवात झाली; पण हे प्रमाण अत्यंत कमी होते. सन 2010 पासून मात्र प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली. सध्या सोलापुरात सुमारे तीन हजार विदेशी यंत्रमाग आहेत.

चिनी बनावटीचे यंत्रमाग जास्त

सोलापूर, भिवंडी, इचलकरंजी, मालेगावात चिनी बनावटी यंत्रमाग मोठ्या प्रमाणात आयात करण्यात येतात. जीएसटी, आयात कर व इतर खर्च मिळून 30 टक्के खर्चाचा बोजा यंत्रमाग उद्योजकांना बसतो. हा खर्च टाळण्यासाठी भारतातील काही कंपन्या चीनहून यंत्रमागाचे सुटे भाग आणतात आणि भारतात यंत्रमाग तयार करतात. यामुळे आयात खर्चाचा बोजा कमी होते. यंत्रमाग उद्योजकांना केवळ जीएसटी भरून असे यंत्रमाग घेता येतात. त्यामुळे चिनी यंत्रमागांची संख्या जास्त आहे.

Back to top button