राज्यातील ८१ रेल्वे स्थानकांचे रूपडे पालटणार | पुढारी

राज्यातील ८१ रेल्वे स्थानकांचे रूपडे पालटणार

आंबादास पोळ

सोलापूर : ज्या त्या शहराच्या ऐतिसासिक, धार्मिक, पौराणिक, नैसर्गिक वैशिष्ट्ये आदी स्थानिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण नटलेली, विमानतळाला साजेशी, अत्याधुनिक साधनांच्या सर्व सुविधा असलेली अशी रेल्वेस्थानके राज्यात लवकरच साकारली जाणार आहेत. देशातील तब्बल 794, तर महाराष्ट्रातील तब्बल 81 स्थानकांची रूपडी अक्षरशः अमुलाग्ररीत्या पालटली जाणार आहेत.

देशातील रेल्वे सेवेला गती मिळावी, यासाठी अमृत भारत योजनेंतर्गत स्थानकांचा कायापाटल करण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. यानुसार स्थानकांच्या पुनर्विकासासंदर्भात रेल्वे खात्याने सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आता देशातील रेल्वेस्थानके ही जणू विमानतळाशी स्पर्धा करणारी ठरतील. पुनर्विकास झाल्यानंतर रेल्वेस्थानके विमानतळासारखी आलिशान दिसणार आहेत.

पुनर्विकास प्रकल्पासाठी भारतीय रेल्वेने महाराष्ट्रातील निवडलेल्या स्थानकांच्या पहिल्या टप्यात मुंबई सेंट्रल, लोकमान्य टिळक टर्मिनल, ठाणे, वांद्रे टर्मिनल, बोरीवली आणि पुणे या स्थानकांचा समावेश आहे. दुसर्‍या टप्प्यात कल्याण, नाशिक रोड, अमरावती, सोलापूरचा समावेश आहे.

अशी असतील स्थानके

  • प्रवाशांना स्थानकावर वेळ घालवण्यासाठी स्थानकाच्या छतावर प्लाझा बांधण्यात येणार
  • फूड कोर्ट आणि लहान मुलांसाठी खेळण्याची जागा व त्याठिकाणी खेळणी असणार आहेत
  • स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडेल अशी असेल स्थानकाच्या प्रवेशद्वाराची रचना
  • स्थानकावरील गर्दी टाळण्यासाठी आत व बाहेर जाण्याचा मार्ग वेगवेगळा असेल
  • प्रत्येक फलाटावर लिफ्ट व सरकता जिना असेल

स्थानिक वस्तूंचे विक्री केंद्र

पुनर्विकास योजनेंतर्गत संबंधित स्थानक हे सौरऊर्जा प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंगसह हरित इमारती पद्धतीने उभारण्यात येणार आहे. सर्वच स्थानकांवर प्रवाशांच्या संचलनासाठी जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिव्यांगासाठी नव्या स्थानकात विशेष सुविधा असेल, तसेच ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी विशेष आसन कक्षही असेल. प्रत्येक स्थानक हे वायफाय सेवा देणारे असेल. स्थानिक वस्तूंचे विक्री केंद्र, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय, एटीएम आदी सुविधा देण्यात येणार आहेत.

Back to top button