सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजनेची 45 हजार घरे | पुढारी

सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजनेची 45 हजार घरे

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सोलापुरात सुमारे 45 हजार घरांच्या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी काही घरे बांधून पूर्ण झाली असून उवर्रित प्रगतीपथावर आहेत. दरम्यान, या योजनेच्या घटक क्र. चारसाठी लवकरच दुसर्‍या टप्प्याचे अनुदान प्राप्त होणार आहे. त्यामुळे यासंदर्भातील प्रकल्पांना चालना मिळणार आहे.

सन 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. देशातील कुठलेही कुटुंब घरापासून वंचित राहू नये व त्यांना परवडणार्‍या दरात घर मिळण्याबाबत ही योजना आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, कमी उत्पन्न गट, मध्य उत्पन्न गट एक तसेच मध्य उत्पन्न गट दोन अशा एकूण चार घटकांसाठी ही योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन झोपडपट्टीधारकांना पक्के घर बांधता येतात. ज्यांच्याकडे घर नाही पण जमीन आहे, असे लोक योजनेचा लाभ घेऊ शकतात. बिल्डरकडून बांधण्यात येणार्‍या गृहप्रकल्पांमधील घरे या योजनेंतर्गत घेता येतात. लाभार्थ्याला केंद्राकडून दीड लाख, तर राज्याकडून एक लाख असे एकूण अडीच लाखांचे अनुदान देण्याची तरतूद या योजनेत आहे. सोलापुरात या योजनेसाठी आतापर्यंत एकूण 55 हजार जणांनी अर्ज केला होता, त्यापैकी 45 हजार अर्जांना मंजुरी मिळाली. या योजनेसाठी शहरात महापालिका ही नोडल एजन्सी म्हणून काम पार्हत आहे. एकूण चार घटकांपैकी चौथ्या घटकाला मिळणारे अनुदान नोडल एजन्सीच्या माध्यमातून दिले जाते.

आतापर्यंत तीन कोटींचे अनुदान

घटक क्रमांक चारसाठी महापालिकेकडे 792 अर्ज आले होते, त्यापैकी 592 अर्जांना मंजुरी मिळाली. यापैकी सध्या 307 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. बांधकामाच्या प्रगतीनुसार अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत घटक क्र. चारसाठी यापूर्वी चार कोटींचे अनुदान प्राप्त झाले होते. आता पुढील टप्प्याचे अनुदान देण्याबाबत आवश्यक प्रक्रिया महापालिकेकडून करण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या महिनाभरात दुसर्‍या टप्प्यातील अनुदान मिळणार आहे. त्यामुळे या अशा गृहप्रकल्पांच्या कामाला गती मिळणार आहे, अशी माहिती महापालिकेतील या योजनेचे काम पाहणारे अधिकारी नागनाथ पदमगोंडा यांनी दिली.

प्रधानमंत्री आवास योजनेची शहर व ग्रामीणसाठी स्वतंत्र योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन लोक आपल्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती करीत आहेत. सोलापुरात या योजनेंतर्गत हजारो घरे निर्माण होत आहेत. आगामी काळात बांधकाम पूर्ण होऊन घरे वसणार आहेत. योजना जाहीर केल्यानंतर या योजनेची मुदत मार्च 2022 पर्यंत होती, मात्र लोकांच्या आग्रहास्तव सरकारने ती डिसेंबर 2024 पर्यंत वाढवून दिली आहे.

एकट्या ‘रे नगर’मध्ये 30 हजार घरे

सोलापुरात मंजूर 45 हजार घरांमध्ये कुंभारी येथील रे नगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या 30 हजार घरांचा समावेश आहे. रे नगरात पहिल्या टप्प्यातील 15 हजार घरांचे काम येत्या नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. या घरकुल वाटपासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी पंतप्रधानांचे विशेष लक्ष आहे, हे येथे उल्लेखनीय.

Back to top button