घाबरून विहिरीत पडल्याने दोन बैलांचा मृत्यू; अक्कलकोट तालुक्यातील बणजगोळ गावातील घटना | पुढारी

घाबरून विहिरीत पडल्याने दोन बैलांचा मृत्यू; अक्कलकोट तालुक्यातील बणजगोळ गावातील घटना

हंजगी; पुढारी वृत्तसेवा : अक्कलकोट तालुक्यातील बणजगोळ परिसरात शनिवारी रात्री वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू होता. विजांच्या कडकडाटामुळे राजशेखर मुळे यांच्या शेतात बांधलेल्या दोन बैलांनी घाबरून विहिरीत उड्या टाकल्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला. महिन्यापूर्वीच हे बैल आणले असून मुळे कुटुंबीयांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

अचानक दोन्ही बैलांचा मृत्यू झाल्यामुळे बणजगोळ ग्रामस्थांतून हळहळ व्यक्त होत आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर राजेश मुळे यांच्या कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. एक महिन्यापूर्वीच राजशेखर मुळे यांनी एक लाख ६० हजार रुपये देऊन बैलजोडी खरेदी केली होती. बणजगोळ येथे रात्री १०.३० वाजता बारीक पाऊस सुरू होता. आकाशात विजांचा कडकडाट सुरू होता.

विहिरीजवळच बैलगोठा असल्याने बैल घाबरून खुंटी तोडून विहिरीत पडल्याने दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला आहे. संबंधित घटनेचा पंचनामा तलाठी भिसे व शासकीय पशुवैद्यकीय डॉक्टरांनी घटनास्थळी येऊन करून अहवाल तहसील कार्यालयाकडे सुपूर्द केला आहे.

मागच्याच महिन्यात एक लाख ६० हजार रुपये देऊन बैलजोडी खरेदी केली होती. रातोरात माझ्या गोठ्यातील बैलजोडीवर संकट कोसळले आहे. या घटनेची शासकीय स्तरावर दखल घेऊन मला खरीप हंगाम पेरणीपूर्वी आर्थिक मदत मिळावी.
-राजशेखर मुळे, शेतकरी, बणजगोळ

 

Back to top button