जागतिक पर्यावरण दिन : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। | पुढारी

जागतिक पर्यावरण दिन : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे।

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। पक्षी ही सुस्वरे आळविती॥ जागतिक पर्यावरण दीन आणि पावसाची सुरुवात म्हणजे सगळीकडे वृक्षारोपणाचा सोहळा असतो. पावसाळा जवळ आलाय आता. बर्‍याच ठिकाणी वृक्षारोपणाची लगबग सुरू होणार. ही एक चांगलीच आणि सकारात्मकच गोष्ट आहे. पण वृक्षारोपण करण्याआधी घाईगडबड न करता काही गोष्टी आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

बर्‍याच लोकांचा कल भरभर वाढणार्‍या विदेशी वृक्षांकडे असतो. त्यांच्या लागवडीमुळे नेमका काय परिणाम होतो, हे नीट समजून घेणे गरजेचे. त्यामुळे जरा थांबा आधी समजून घ्या मग वृक्षारोपणाचे आपले आराखडे बांधा. काहींच्या मते, झाड झाड असते, ते देशी असो की विदेशी असो. म्हणूनच हे सांगण्याची गरज येते, की देशी वृक्ष आणि विदेशी वृक्ष लागवडीमुळे नेमके काय होते ते. देशी व प्रदेशनिष्ट वृक्षांचे महत्त्व समजून घेणे गरजेचे आहे. देशी व प्रदेशनिष्ट वृक्ष, हे तेथील पर्यावरणीय परिसंस्थेची साखळी अबाधित राखण्यासाठी आपल्या प्रत्येक ठिकाणच्या वातावरणानुसार महत्त्वाचे आहे. लागवड करताना त्याचा विचार होणे गरजेचे आहे. 1.3 अब्ज लोकसंख्येला सावली देण्यासाठी भारतात केवळ 35 अब्ज झाडे आहेत. जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये, भारताची (लोकसंख्या, 1.267 अब्ज) वृक्षसंख्या केवळ 35 अब्ज आहे. ज्यामुळे प्रति व्यक्ती फक्त 28 झाडे आहेत.

सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, जिल्ह्यातील जैवविविधता मोठ्या प्रमाणात आहे. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात झालेले महागामार्ग आणि दळणवळणाची साधने यांच्यातील विकास यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाली. दिवसेंदिवस तापमान वाढत आहे. महापालिकेच्या वृक्ष गणना अहवालानुसार सोलापूरमध्ये दरडोई किमान 14 झाडे असणे अपेक्षित आहे. मात्र, सोलापूर शहरात वाढते शहरीकरण आणि इतर बाबीचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने शहरातील हिरवाई नष्ट झाली. शहरातून विविध महामार्ग जातात. त्याच्या आजूबाजूला जी वनराई होती ती नष्ट झाली आहे. विजापूर राष्ट्रीय महामार्ग 15 वर्षापूर्वी पाहिला असता दुतर्फा झाडे असल्याने निसर्गरम्य वाटत होता.

आज मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून देखील प्रत्येक वर्षी तापमानात होणारी वाढ आणि त्याचे दुष्परिणाम आपण अनुभवत आहोत. कोविडमध्ये आपण सर्वांनी ऑक्सिजनची गरज आणि तुटवडा खूप जवळून अनुभवला आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी मिळून संकल्प करूया. यावर्षी किमान प्रत्येकाने एक झाड लावू आणि त्याची काळजी घेऊ. प्रत्येकाने आपल्या आपल्या घराजवळ, शेतात, शाळेत वृक्षारोपण केल्यास येत्या काळात आपणास हवामानात होणारे बदल आणि तापमान वाढ या संकटाना सामोरे जाण्यास मदत होईल. जर वर्षी आपण पर्यावरणदिन पाच जूनला साजरा करतो.

यावर्षी प्लास्टिक विषयक जनजागृती या विषयास घेऊन पर्यावरण दिनाची थीम आहे. आपण देखील आपल्या रोजच्या जीवनात कमीत कमी प्लास्टिकचा वापर करून पर्यावरणाची होणारी हानी वाचवण्यासाठी प्रयत्न करुया. संकल्प नको कृती करूया. पर्यावरण रक्षणासाठी सज्ज होऊया.
– प्रा. रश्मी माने, युगंधर फाऊंडेशन, सोलापूर.

 

Back to top button