टेंभुर्णी : निवडणुकीमुळे बँकेस 25 लाखांचा तोटा | पुढारी

टेंभुर्णी : निवडणुकीमुळे बँकेस 25 लाखांचा तोटा

टेंभुर्णी; पुढारी वृत्तसेवा : बँकेचे हित डोळ्यासमोर ठेऊन थकीत कर्ज वसुली केल्यानेे विरोधकांना खुपत आहे. त्यामुळे विरोधकांनी ही निवडणूक लादल्याने या निवडणुकीमुळे बँकेस 25 लाख रुपयांचा तोटा सोसावा लागणार आहे. यास सर्वस्वी विरोधक जबाबदार असल्याचे प्रतिपादन दि पंढरपूर मर्चंट को-ऑप. बँकेचे चेअरमन नागेश भोसले यांनी केले.

दि पंढरपूर मर्चंट बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारार्थ टेंभुर्णी येथील उमेदवार विजयकुमार कोठारी यांच्या कार्यालयात आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, 2015 पासून आम्ही सर्व संचालक व सभासदांच्या विश्वासावर ही बँक पुढे नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. बँकेस सात वर्षे ‘अ’ वर्ग दर्जा आहे. राष्ट्रीयीकृत बँकेच्या सर्व सुविधा बँकेमध्ये पुरविल्या जात आहेत. व्यापारी, डॉक्टर, महिला, नोकरदार यांना कर्जपुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 0.5 टक्के जादा व्याजदर देण्यात येत आहे.

सभासदांना 12 टक्के लाभांश देणारी एकमेव बँक असताना केवळ विरोधकांनी घेतलेले कर्ज आम्ही वसूल केले. यामध्ये जवळपास बँकेचे पाच कोटी रुपये वसूल झाले. याचाच राग मनात धरुन विरोधकांनी ही निवडणूक लावली आहे. यामध्येही आमच्या सहकार विकास आघाडीचे एससी उमेदवार बिनविरोध झालेले आहेत. भविष्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत मर्चंट बँकेच्या शाखा उभारण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. यावेळी सोमनाथ डोंबे, विजयकुमार कोठारी, शीतल तांबोळी, सुरेश शहा, संतोष रसाळ, वैभव गांधी, जयकुमार लटके, नंदकुमार दोशी, बलभीम लोंढे, प्रशांत गांधी, राजेंद्र फडे, भगीरथ म्हमाने, नागनाथ कानडे, प्रकाश शहा, नितीन लऊळकर, उदय सातव, बाळासाहेब बारवे, विशाल आटकळे आदी उपस्थित होते.

Back to top button