सोलापूर : शिवभोजन योजना गुंडाळणार | पुढारी

सोलापूर : शिवभोजन योजना गुंडाळणार

सोलापूर; महेश पांढरे :  जिल्ह्यातील शिवभोजन योजना गुंडाळण्याच्या मार्गावर असून गेल्या सहा महिन्यांपासून शिवभोजन चालकांची बिले दिली नाहीत. त्यामुळे वैतागलेले चालकच आता या योजनेकडे दुर्लक्ष करीत आहेत. दुसरीकडे, लाभार्थ्यांचा फोटो अपलोड करा, अन्यथा शिवभोजन केंद्रे बंद करा, असा फतवा पुरवठा विभागाने काढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिवभोजन केद्रांना घरघर लागली आहे.

माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची महत्त्वाकांक्षी असलेली ही योजना राज्यात मोठ्या धुमधडाक्यात सुरू झाली होती. आतापर्यंत या शिवभोजन थाळीचा लाखो लोकांनी लाभ घेतला आहे. समाजातील गरीब लोकांना किमान दोनवेळचे पोटभर जेवण मिळावे यासाठी ही योजना शिवसेनेने सुरू केली होती. मात्र त्यानंतर आलेल्या भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने या योजनेकडे काहीअंशी दुर्लक्ष केले आहे. जिल्ह्यातील जवळपास 13 शिवभोजन केंद्र चालकांची गेल्या पाच ते सहा महिन्यांपासूनची बिले अद्याप दिली नाहीत. त्यांचे जवळपास 80 ते 90 लाख रुपये प्रलंबित असल्याने शिवभोजन चालकांनी नुकतीच पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन ही बिले मिळावीत, अशी विनंती केली आहे.

दुसरीकडे, शिवभोजन केंद्रावर विश्वासार्हता राहिलेली नाही. दररोज जिल्ह्यात जवळपास दीड हजार थाळ्यांचे उद्दिष्ट आहे. चालकांना जे लाभार्थी शिवभोजन घेण्यासाठी येतात, त्यांचे शिवभोजन थाळीसह फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे. मात्र अनेक शिवभोजन चालक हे फोटो अपलोड करत नाहीत. काहीवेळा एकाच लाभार्थ्याचे सातत्याने फोटो अपलोड केले जात असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांना आता नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एकतर लाभार्थ्यार्ंचे फोटो अपलोड करा, अन्यथा शिवभोजन केंद्रे बंद करा, असाच फतवा आता पुरवठा विभागाने काढला आहे. त्यामुळे शिवभोजन केंद्र चालकांची मानसिकता बिघडली आहे.

जेवण द्यायचे की थट्टा करायची?

शिवभोजन केंद्रात जेवणासाठी येणार्‍या लाभार्थ्यांचे थाळीसह फोटो काढून वेेबसाईटवर अपलोड करण्याचे बंधनकारक केले आहे. फोटो अपलोड केले नाहीत तर बिले दिली जाणार नाहीत. अशा नोटिसा दिल्या आहेत. दुसरीकडे येणार्‍या गरीब लोकांना जेवण द्यायचे की त्यांचे जेवतानाचे फोटो काढून त्यांची थट्टा करायची, असा प्रश्न आता शिवभोजन चालकांसमोर उभा राहिला आहे.

Back to top button