चैत्री यात्रेनिमित्त पंढरीत चार लाख भाविक | पुढारी

चैत्री यात्रेनिमित्त पंढरीत चार लाख भाविक

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा रविवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत हरिनामाच्या जयघोषात पार पडला. उन्हाळ्याचे दिवस असूनही, उन्हातान्हात भाविक चंद्रभागा स्नान व विठ्ठल दर्शनासाठी गर्दी करत होते. सुमारे चार लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली. पंढरीत वारी पोहोचती करून, भाविक शिखर शिंगणापूरला जात असल्याने चैत्री वारी ही धावती वारी असल्याचे दिसून आले.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेतही एक लाखावर भाविक उभे आहेत. ही दर्शन रांग पत्रा शेडमध्ये पोहोचलेली आहे; तर मंदिर परिसरात मुख दर्शनासाठी व कळस दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. भाविकांनी प्रथम चंद्रभागा स्नान करण्यास प्राधान्य दिले. त्यामुळे गर्दीने चंद्रभागा वाळवंट फुलले आहे. मंदिर समितीच्या वतीने खिचडी, चहा, पाणी, ताक, मठ्ठा आदींची मोफत व्यवस्था करण्यात आली असल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले. भक्तिसागर 65 एकर येथे देखील भाविक तंबू, राहुट्या उभारून भजन, कीर्तन व प्रवचनात दंग झालेले आहेत. मात्र, गतवर्षीच्या चैत्री यात्रेच्या तुलनेत येथे भाविकांची संख्या कमी आहे. चंद्रभागा वाळवंट व मंदिर परिसरातच भाविकांची जास्त गर्दी दिसून येते.

दरम्यान, रविवारी चैत्र शुद्ध एकादशीला उपवास असूनही, विठुरायाला दुपारी पुरणपोळीचा महानैवेद्य दाखविण्यात आला आहे. पुरणपोळीचा महानैवेद्य देण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही पाळली जात आहे. याचे कारण म्हणजे भाविक चैत्री एकादशीला पंढरीत येऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन शिखर शिंगणापूरला जातात. येथे शंकर-पार्वतीचा विवाह सोहळा असतो. या विवाहाला साक्षात विठुरायाही गेले आणि लग्नात पंचपक्वान्नाचे भोजन केले, अशी आख्यायिका वारकरी संप्रदायात सांगितली जाते. त्यामुळे पुरण पोळीचा नैवेद्य हे चैत्री यात्रेचे खास वैशिष्ट्य मानले जाते.

दर्शन रांगेत पाणी मिळेना

उन्हाळा सुरू असल्यामुळे तापमान वाढलेले आहे. यातच भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढत आहे. भाविकांना मंदिर समितीकडून मोफत पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र ऐन एकादशी दिवशी पाणी संपल्यामुळे भाविकांना पाणीपुरवठा करणे थांबले होते.

पहाटे नित्यपूजा

चैत्री यात्रा शुद्ध एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य अ‍ॅड. माधवी निगडे यांच्या हस्ते पहाटे पार पडली. मंदिरात आकर्षक फुलांची आरास करण्यात आल्याने, नयनरम्य व भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.

Back to top button