आज चैत्री यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा; वैष्णवांच्या मांदियाळीने गजबजली पंढरी | पुढारी

आज चैत्री यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा; वैष्णवांच्या मांदियाळीने गजबजली पंढरी

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :  चैत्री यात्रा कामदा एकादशीचा मुख्य सोहळा रविवार, 2 एप्रिलला लाखो वैष्णवांच्या उपस्थितीत पार पडत आहे. तब्बल दोन वर्षांनंतर कोरोना निर्बंधमुक्त यात्रा साजरी होत असल्याने भाविकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. सुमारे 4 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली. श्री विठुरायासह रुक्मिणीमातेचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शन रांगेतही एक लाखावर भाविक उभे आहेत. ही दर्शन रांग पत्राशेडमध्ये पोहोचलेली आहे. उन्हाचा चटका असला तरी दर्शन रांग व मंदिर परिसरात शेडनेटची सावली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे भाविक भक्तीत तल्लीन असल्याचे चित्र दिसून येते.

दरम्यान, चैत्री शुद्ध एकादशीनिमित्त श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते तर रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य अ‍ॅड.माधवी निगडे यांच्या हस्ते करण्यात करण्यात येत असल्याची माहिती सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. चैत्री एकादशीला आलेले भाविक चंद्रभागा स्नान करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे कामदा एकादशी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांनी चंद्रभागा वाळवंट फुलले आहे. भाविक स्नानाचा आनंद घेत आहेत. मंदिर समितीच्या वतीने वाटरप्रूफ दर्शन रांग उभारण्यात आली आहे. पत्राशेड येथे कायमस्वरूपी चार तर तात्पुरते दोन असे सहा दर्शन शेड उभारण्यात आलेले आहेत. भाविकांसाठी खिचडी, चहा, पाणी, ताक, मठ्ठा आदींची मोफत व्यवस्था करण्यात आली असल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

भक्तीसागर 65 एकर येथे देखील भाविक तंबू, राहुट्या उभारून भजन, कीर्तन व प्रवचनात दंग झालेले आहेत. येथेही लाखाहून अधिक भाविक आहेत. भाविकांची वारी सुरक्षित पार पडावी म्हणून 1048 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग, 65 एकर व शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बसवलेल्या 130 सीसीटीव्हीची करडी नजर आहे. दरम्यान, यात्रेला आलेला भाविक श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन झाले की शिखर शिंगणापूरला यात्रेला जात असल्याचे चित्र दिसून येत होते. त्यामुळे बहुतांश कावडी या चंद्रभागेत स्नान करून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन शिखर शिंगणापूरकडे मार्गस्थ होताना दिसत आहेत.

विठ्ठलास पुरणपोळीचा नैवेद्य

रविवारी चैत्र शुद्ध एकादशीला उपवास असूनही विठुरायाला दुपारी पुरणपोळीचा महानैवेद्य दाखविण्यात येणार आहे. पुरणपोळीचा महानैवेद्य देण्याची शेकडो वर्षांची परंपरा आजही पाळली जात आहे. याचे कारण म्हणजे भाविक चैत्री एकादशीला पंढरीत येऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन शिखर शिंगणापूरला जातात. येथे शंकर पार्वतीचा विवाह सोहळा असतो. या विवाहाला साक्षात विठूरायाही गेले आणि लग्नात पंचपक्वानाचे भोजन केले, अशी आख्यायिका वारकरी सांप्रदायात सांगितली जाते. त्यामुळे विठ्ठलास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, तर रुक्मिणीमातेला नेहमीचाच नैवेद्य दाखवण्यात येणार आहे.

Back to top button