शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरूवात; हर्रऽऽ बोला हर्रऽऽ’चा गजरात ६८ लिंगांना तैलाभिषेक | पुढारी

शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला सुरूवात; हर्रऽऽ बोला हर्रऽऽ'चा गजरात ६८ लिंगांना तैलाभिषेक

सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या महामारी संकटामुळे सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला ब्रेक लागला होता. दोन वर्षानंतर’हर्रऽऽ बोला हर्रऽऽ’चा पुन्हा गजर झाला.

“सिद्धेश्वर महाराज की जय’चा गगनभेदी अखंड जयघोष… साथीला हलग्यांचा कडकडाट, बँड, तुतारी, व पारंपरिक वाद्यांचा निनाद… पांढरीशुभ्र बाराबंदी परिधान केलेल्या सेवेकऱ्यांची गर्दी… आकाशाला गवसणी घालणारे मानाचे सात नंदीध्वज लवाजम्यासह मल्लिकार्जुन मंदिरजवळील मानकरी राजशेखर हिरेहब्बू वाड्यातून नंदीध्वजांच्या मोठ्या भक्तीमय वातावरणात मिरवणुकीला सुरूवात झाली.

सकाळी नऊ वाजता आकाशाला गवसणी घालणारे मानाचे सोनेरी नंदीध्वजासह सात नंदीध्वजाला श्री सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्यात आला. यानंतर सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेला सुरूवात झाली.

मानक-यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या व दुसऱ्या नंदीध्वजांची पूजा पार पडली. त्यानंतर नंदीध्वज हिरेहब्बू यांच्या वाड्यापासून तैलाभिषेक करण्यासाठी मार्गस्थ झाले. हार, खोबरे, खारीक हार यांनी सजवलेले नंदीध्वज, भक्तांच्या डोक्यावर तैलाभिषेक घालण्यासाठी काळ्या रंगाच्या मातीच्या घागरी घोडे, उंट, बग्गी, हलगीचा कडकडाट शहरवासीयांना कोरोनानंतर पुन्हा अनुभवायला मिळाली.

सिद्धेश्वरांची पालखी, संपूर्ण सोलापूर व पंचक्रोशीतील सिद्धेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक करण्यासाठी सातही नंदीध्वज बाळीवेस, माणिक चौक, विजापूर वेस येथे सातही नंदीध्वज, सिद्धेश्वर महाराजांची पालखी, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने गुलाब फुलांची पुष्पसृष्टी करत” हम सब एक है” चा नारा देण्यात आला.

पुढे या मार्गावरून मानाचे सात नंदीध्वज व मिरवणूक सिद्धेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. सिद्धेश्वर प्रशालेसमोर कलेक्टर ऑफिसजवळ मानाचे सात नंदीध्वज एकत्र आल्यावर सरकारी आहेर करण्यात आला. हा मान ब्रिटिश काळापासून आजही सुरू आहे.

तेथून सर्व नंदीध्वज एक वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर मंदिरात ६८ लिंगापैकी पहिले लिंग अमृतलिंगाजवळ आले. तिथे तैलाभिषेक घालून त्या लिंगाची विधिवत पूजा केली. पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी विडा देण्यात आला.

मिरवणुकी दरम्यान सर्वत्र रस्त्यांवर रांगोळी काढण्यात आल्‍या होत्‍या. पालखी व नंदीध्वजाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. मिरवणूक मार्गावर भाविकांकडून ठिकठिकाणी बाराबंदी परिधान केलेल्या व भक्तांना पाणी,चहा,दूध,केळी फळांचे वाटप करण्यात आले. अमृतलिंगच्या समोर देशमुख, कळके, बहिरो पाटील,भोगडे, थोबडे, सिद्धय्या स्वामी,मल्लिनाथ जोडभावी, दर्गोपाटील,शिवशेट्टी, गवसने, इटाणे (पूजेचेमानकरी, झोळीवाले मानकरी) यांना विड्याचा मान देण्यात आला. पुढे गर्भ मंदिरात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या गदगीचे विधिवत पूजा पार पडली.

दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पुन्हा नंदीध्वज मिरवणुकीस सुरूवात झाली. ही मिरवणूक डफरीन चौक,महापौर बंगला, रेल्वेस्टेशन, जुनीकंपाऊंड मिल, एस.टी. स्‍डॅण्ड परिसर,सम्राट चौकमार्गे निघाली. ६८ लिगांना तैलाभिषेक करून व प्रदक्षिणा घालून रात्री नंदीध्वज परत आले. यामध्ये चप्पल न घालता मानकरी,भक्त, सेवेकरी ६८ लिंग तैलाभिषेक दर्शन करण्यासाठी पायी चालत होते.

मिरवणूक मार्गावर पोलिसांचा बंदोबस्त, वाहतूक मार्गात बदल

सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नंदीध्वजाची मिरवणूकील सुरुवात झाली होती. मिरवणूक मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आले होते. तर मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पोलीसांचा बंदोबस्‍त करण्यात आला होता.

Back to top button