सोलापूरी पारंपारिक वाद्यांना कर्नाटक व आंध्र प्रदेशातून मागणी | पुढारी

सोलापूरी पारंपारिक वाद्यांना कर्नाटक व आंध्र प्रदेशातून मागणी

सोलापूर : अंबादास पोळ ः गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये सोलापुरातील पारंपारिक वाद्यासह डॉल्बीला कर्नाटक व आंध्र प्रदेशात मागणी आहे. मागील दोन वर्ष कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. तसेच मिरवणुकांवर बंदी असल्याने पारंपारिक वाद्य व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. पण यंदा मात्र निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत असून गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोल, ताशा, लेझीम, झांज या पारंपरिक वाद्ये घुमत आहेत.

मानाच्या गणपती मंडळाकडून विसर्जन मिरवणूकीसाठी तसेच आगामी नवरात्रोत्सवासाठी रथ, पालखी, घोडे, उंट, याचबरोबर पारंपारिक वाद्ये ढोल,ताशा, संबळ, सनई, चौघडा, लेझीम, झांज, टिपरी या पथकांना पसंती दर्शवली जात आहे. गेल्या काही वर्षपासून ढोल पथकांत महिला व मुलींची लक्षणीय उपस्थिती दिसून येते.

प्रशासनाकडून डॉल्बीच्या आवाजावर मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. यामुळे पारंपरिक ढोल-ताशा पथकांच्या मागणीत वाढ झाली आहे. यामूळे काही मंडळाकडून आगाऊ बुकिंग झालेली असून गेल्या दीड दोन महिन्यांपासून नवीन लय, ठेका व ताल शिकण्यासाठी तर काही नवीन सदस्यांना प्रशिक्षित करण्यासाठी बहुतांश ढोलताशा पथकातील तरुणाई या सरावातून मेहनत घेत आहे. लेझीम पथकात साधारण 16 वर्षे वयोगटापासून ते 40 वर्ष वयोगटाप्रमाणे शंभरपेक्षा अधिक सदस्यांचा सहभाग असताे.

एक दिवसाच्या मिरवणुकीला लाखांहून अधिक रक्‍कम

एक दिवसाच्या मिरवणुकीला कमीत कमी एक लाख ते जास्तीत जास्त तीन लाखाहून अधिक पैसे देण्यात येतात. तसेच लेझीम 50 सदस्य पथकाला 50 हजार रुपये तर ढोल, ताशा वाजवणाऱ्या एका कलाकाराला 2 ते 3 हजार रुपये , गाणे म्हणणाऱ्या गायकाला पाच ते दहा हजार रुपये, तर बॅन्जोसाठी 50 ते 80 हजार रुपये दिले जात आहे.

Back to top button