पंढरपूर शहरासह तालुक्यात मुसळधार | पुढारी

पंढरपूर शहरासह तालुक्यात मुसळधार

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :  पंढरपूर शहर व तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून रिपरिप पावसाची बरसात सुरू आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा मात्र दिवस व रात्रभर पाऊस येत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जनावरांच्या चार्‍यांचा प्रश्‍न भेडसावत आहे तसेच शेतातील कामे ठप्प झाली आहेत. ग्रामीण भागातील रस्ते चिखलमय झाले आहेत. रिमझिम पावसामुळे नागरिकांना घरातून बाहेर पडणे मुश्कील झाले आहे. पंढरपूर शहरात सर्वाधिक 32 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

आषाढी यात्रेकरिता पालख्या, दिंड्या पंढरीत दाखल झाल्या आणि पावसाला सुरुवात झाली. दशमीला 9 जुलै रोजी सुरू झालेला पाऊस दररोज हजेरी लावत आहेत. रिमझिम व मध्यम स्वरूपाचा पाऊस असल्याने दिवसभर सुरू राहत आहे. या पावसाने भाविकांची, व्यापार्‍यांची तारांबळ तर उडवलीच, मात्र शेतकर्‍यांचे व सर्वसामान्य नागरिकांचेही दैनंदिन जनजीवन विस्कळीत केले आहे.

पाऊस दिवसभर येत असल्याने शेतातील कामे ठप्प झाली आहेत. फळबागांना औषध फवारणी करता येत नाही. त्यामुळे डाळिंब, बोर, पेरु आदी फळबांगावर करपा, तेल्या, कुजवा आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डाळिंब बागेसाठी रिमझिम पाऊस तेल्या रोगाला आमंत्रण देत आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. बोरीचा हहगाम सुरू असून बागा फुलोर्‍यात आहेत. या पावसामुळे फूलगळती होत असून फुलांमध्ये पाणी साचून राहिल्याने नासाडीदेखील होत आहे.

शहराबरोबर ग्रामीण भागातील रस्त्यांवर विशेषत: खडड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातील मुरुमीकरण झालेले रस्ते व शेतरस्ते चिखलाने माखले गेले आहेत. यामुळे सायकल, मोटारसायकलधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा पाऊस फळबागधारकांना चिंतादायक असला तरी ऊस उत्पादक शेतकर्‍यांना आनंददायक आहे. या भीज पावसामुळे उसाची वाढ जोमाने होण्यास मदत होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. या रिमझिम पावसात शालेय विद्यार्थी, शेतकरी व ज्येष्ठ नागरिक भिजत असल्याने त्यांना थंडी, ताप, खोकला, डोकेदुखी आदी आजारांचाही सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

दि. 13 रोजीचे पर्जन्यमान मंडलनिहाय

  • करकंब -11 मि.मी
  • पट.कुरोली – 11 मि.मी.
  • भंडीशेगाव – 12 मि.मी.
  • भाळवणी – 07 मि.मी.
  • कासेगाव -05 मि.मी.
  • पंढरपूर -32 मि.मी.
  • तुंगत – 06 मि.मी.
  • चळे – 18 मि.मी.
  • पुळूज – 19 मि.मी.
  • आजचा पाऊस- 105 मि.मी.
  • सरासरी पाऊस-11.66 मि.मी.

Back to top button