सोलापूर : नशिबावर हवाला ठेऊन झाल्या 55 टक्के पेरण्या | पुढारी

सोलापूर : नशिबावर हवाला ठेऊन झाल्या 55 टक्के पेरण्या

दक्षिण सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  जून महिना उलटला तरी अद्याप दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे प्रतीक्षेचा अंत पाहत नशिबावर हवाला ठेऊन दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी पेरणीचे धाडस करू लागले आहेत. आतापर्यंत तालुक्यात 55 टक्के पेरण्या झाल्याची माहिती तालुका कृषी खात्याने दिली आहे.

सुरुवातीला रोहिणी नक्षत्रात थोडाफार पाऊस झाला. मृगाने निराशा केली आणि आता आर्द्रा नक्षत्रात रिमझिम पावसाची हजेरी लागत आहे. त्यातही सातत्य दिसून येत नाही. दमदार पावसाअभावी खरिपाच्या पेरण्या लांबल्या. मात्र, प्रतीक्षा करून शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केली. सध्या ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची उपलब्धता आहे, अशा शेतकर्‍यांची खरीप पिके तग धरतील, अशी परिस्थिती आहे. मात्र, ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता नाही त्यांची पिके बेभरवशाचीच राहतील, अशी शक्यता व्यक्‍त होत आहे.

जर पावसाने साथ दिली तरच खरिपाचे पीक हातात येणार आहे. सध्या तालुक्यात शेतकर्‍यांनी उडीद, तूर आणि सोयाबीन पेरणीवर अधिक भर दिल्याचे दिसत आहे. त्या खालोखाल मूग आणि भ्ाुईमुगाची पेरणी होत आहे. तालुक्यातील पश्ाुधन घटल्याने सध्या बहुतांशी पेरण्या या यंत्राच्या साह्याने होत आहेत. पेरणी करण्यासाठी एकरी 1200 रुपये इतका दर आकारला जात आहे. गतवर्षी हेच दर 900 रुपये इतके होते. दरवाढीला डिझेल महागल्याचे कारण सांगितले जात आहे.

दक्षिण सोलापूर तालुक्यात खरिपाच्या 55 टक्के पेरण्या झाल्याचे तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी यांनी सांगितले. खरिपाचे सरासरी क्षेत्र 21,168 हेक्टर आहे. आतापर्यंत 18,665 हेक्टरवर पेरण्या झाल्या असून यामध्ये तुरीची पेरणी 3624 हेक्टर, उडीद 4200 हेक्टर, सोयाबीन 2500 हेक्टरवर झालेले आहे. मूग, भ्ाुईमूग या पिकांचीही पेरणी झाली आहे. तूर, उडीद, सोयाबीन या पिकांचीही पेरणी चांगली झाल्याचे तालुका कृषी अधिकारी माळी यांनी सांगितले. सध्या शेतकरी बांधवांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. मात्र, खरीप पेरणीची वेळ निघ्ाून जात असल्याने प्राप्त परिस्थितीत शेतकरीबांधव पेरण्या करीत आहेत.

महिना झाला तरी पेरणीयोग्य पाऊस नाही. नशिबावर हवाला ठेवून सध्या उडीद पेरत आहे. काळ्या आईची ओटी भरावीच लागते. ही परंपरा आहे, म्हणून पेरणी करीत आहे.
– सुरेश दिंडुरे
शेतकरी, होटगी, द.सोलापूर

Back to top button