सेालापूर : जिल्ह्यात 3600 कोटींची वीज थकबाकी | पुढारी

सेालापूर : जिल्ह्यात 3600 कोटींची वीज थकबाकी

सेालापूर : पुढारी वृत्तसेवा:  सोलापूर जिल्ह्यातील 3 लाख 68 हजार 677 शेतकर्‍यांकडे एकूण 5206 कोटी 25 लाख रुपयांची थकबाकी होती. त्यातील महावितरणकडून निर्लेखन तसेच व्याज व दंड माफी आणि वीज बिल दुरुस्तीनंतर समायोजनेतून या शेतकर्‍यांकडे आता 3600 कोटी 16 लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यातील 50 टक्के रक्कम येत्या 31 मार्च 2022 पर्यंत भरल्यास 1800 कोटी 8 लाख रुपये माफ होऊन वीज बिलही संपूर्ण कोरे होणार आहे.

कृषी पंपाच्या थकीत व चालू वीज बिलांच्या भरण्यामधून सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रासाठी प्रत्येकी 87 कोटी 97 लाख असे एकूण 175 कोटी 94 लाख रुपये कृषी आकस्मिक निधीमध्ये जमा झाले आहेत. या निधीमधून वीज यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाचे कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 4 नवीन उपकेंद्र व 18 उपकेंद्राची क्षमतावाढ या निधीमधून प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यातील 3 नवीन उपकेंद्र व 6 उपकेंद्राच्या क्षमतावाढीचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यासह जिल्ह्यात 87 कोटी 36 लाख रुपये खर्चाच्या 2923 विविध कामांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. कृषी आकस्मिक निधीमधून आतापर्यंत 47 कोटी 98 लाख रुपये खर्चाचे 2318 कामे सुरू करण्यासाठी कामाचा आदेश देण्यात आला आहे. त्यातील 1871 कामे प्रगतीपथावर आहे तर 447 विविध कामे पूर्ण झाली आहेत.

कृषी पंपाच्या वीज बिलांतून थकबाकीमुक्त होण्यासाठी राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतील कृषी पंप वीजजोडणी धोरण 2020 मधून मूळ थकबाकीमध्ये सुमारे 66 टक्के सवलत देण्यात येत आहे. त्यातील 50 टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठीची मुदत येत्या 31 मार्चपर्यंत आहे. सोलापूर जिल्ह्यातील 2 लाख 33 हजार 323 शेतकर्‍यांनी या योजनेत सहभाग घेतला असून त्यातील 12 हजार 521 शेतकर्‍यांनी योजनेचा लाभ घेत वीज बिल कोरे केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ 10 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे योजनेत सहभागी होणार्‍या थकबाकीदार शेतकर्‍यांना महावितरणकडून वीज बिलांच्या तत्काळ दुरुस्तीसह सर्व प्रकारचे कार्यालयीन सहकार्य जलदगतीने देण्यात येत आहे.

सुधारित थकबाकीच्या रकमेत 50 टक्के सवलत मिळविण्यासाठी 31 मार्च पूर्वी थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हावे. चालू वीज बिल व थकबाकीची 50 टक्के रक्कम भरून वीज बिल कोरे करावे तसेच कृषी आकस्मिक निधीमधून ग्रामपंचायत क्षेत्र व जिल्हाक्षेत्रातील वीज यंत्रणेच्या विकास कामांना हातभार लावावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

Back to top button