सोलापूर : दीड हजारांसाठी वृद्धेवर बलात्कार करून खून; आरोपीला धरले दोषी | पुढारी

सोलापूर : दीड हजारांसाठी वृद्धेवर बलात्कार करून खून; आरोपीला धरले दोषी

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : डुलचे पैस आणण्यासाठी गेलेल्या 75 वर्षीय वृद्ध महिलेस दीड हजार रूपयांसाठी कडबगाव शिवरातील लिंबाच्या झाडाखाली तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचा अत्यंत क्रुरपणे खून केला. या प्रकरणातील आरोपी मल्लप्पा बसवंत बनसोडे (वय 48, रा. उडगी, ता. इंडी, जि. विजयपूर) याला अतिरिक्त सत्र न्यायाधिश यु. एल. जोशी यांनी दोषी धरले आहे.

या खटल्याचा निकाल आज मंगळवारी 8 मार्च रोजी महिला दिनी लागणार आहे. आरोपीला फाशीच्या शिक्षाची मागणी करणार असल्याचे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी सांगितले. अक्कलकोट तालुक्यातील एका गावात राहणारे पती-पत्नी हे दोघे 19 जानेवारी 2019 रोजी करजगी येथे डुलचे पैसे आणण्यासाठी डीसीसी बँकेत गेले होते. त्यादिवशी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पती एकटाच घरी आला. पण त्याची पत्नी न आल्याने तिच्या मुलाने आईचा शोध सुरू केला. परंतु ती मिळून आली नाही.

त्यानंतर लोकांच्या चर्चेतून समजले की, अक्कलकोट ते तोळणूर गावाकडे जाणार्‍या रोडवरील कडबगाव शिवारात एक वयस्कर महिला मृतावस्थेत पडलेली आहे. त्यामुळे त्याठिकाणी आईला पाहण्यासाठी मुलगा गेला. तेव्हा ती वृद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाली होती. त्यावेळी कडबगावच्या पोलिस पाटील महानंदा माळी यांनी याबाबत अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यास माहिती कळविली. त्यावेळी पोलिसांनी अकस्मात मयताची नोंद केली. त्यानंतर याची चौकशी हवालदार महंमद हारून नाईकवाडी यांनी सुरू केली.

घटनास्थळाचा पंचनामा, मयताचा पंचनामा व साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यानंतर शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. यामध्ये त्या महिलेस अत्यंत क्रुरपणे खून केल्याने रक्तस्त्राव जास्त झाल्याने त्या वृध्द महिलेचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शासनाच्यावतीने हवालदार नाईकवाडी यांनी अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राठोड यांच्याकडे वर्ग करण्यात आला.

साक्षादारामुळेच आरोपीचा शोध

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपी व मृत महिला या दोघांना एकत्र पाहणारा साक्षीदार मल्लिनाथ करपे यांनी पोलिसांसमक्ष जबाब दिला. त्यांनी सांगितलेल्या आरोपीच्या वर्णनावरून पोलिस कॉन्स्टेबल नागेश कोणदे यांनी मैंदर्गी बस स्टॉपवर आरोपी मल्लप्पा बनसोडे याला अटक केली. त्यानंतर आरोपीविरूध्द सबळ पुरावा आल्याने पोलिस निरीक्षक बेरड यांनी न्यायालयात आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले.

15 साक्षीदारांची तपासणी..

या प्रकरणात सरकारतर्फे 15 साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात न्यायवैदक शास्त्र प्रयोगशाळेचा अहवाल व शवविच्छेदन अहवालातून त्या वृध्द महिलेचा क्रुरपणे खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

Back to top button