करमाळा : घरासमोरच केली गांजाची लागवड | पुढारी

करमाळा : घरासमोरच केली गांजाची लागवड

करमाळा ; पुढारी वृत्तसेवा : करमाळा तालुक्यातील धायखिंडी येथे एकाने घरासमोर गांजाची लागवड केल्याप्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली. यामध्ये 45 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक प्रविण साने यांनी फिर्याद दिली आहे.

करमाळा तालुक्यातील धायखिंडी येथे एकाने गांजासद़ृश वनस्पतीची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी सव्वाएकच्या सुमारास धायखिंडीच्या शिवारात पोलिस पथकासह गेले. तेव्हा अंकुश रामू शिंदे (वय 58, रा. धायखिंडी, ता. करमाळा) या संशयित आरोपीने घरासमोरील मोकळ्या जागेत गांजासद़ृश वनस्पतीची लागवड करून त्याची जोपासना केल्याचे पाहणीतून दिसून आले.

शिंदे याने लागवड केलेल्या गांजासदृश्य झाडांची उंची 0.5 फूट ते 3.5 फूट उंच आहे. हिरवीगार व उग्र वासाची ही वनस्पती होती. त्यापैकी काही झाडांना फुले आलेली असून गांजासदृश्य झाडे मुळासह उपटून पथकाने त्याचे वजन केले. तेव्हा वनस्पतीचा पाला व मुळास असलेल्या ओल्या मातीसह 6.5 किलो भरले. हा मुद्देमाल जप्त केला आहे. याची अंदाजे 45 हजार 500 हजार किंमत आहे.

गांजासदृश्य वनस्पतीच्या झाडांच्या मुळाची माती व झाडापासून 5 फुटावरील साधी माती तपासणीस पाठविण्यासाठी वेगवेगळ्या पाकिटामध्ये पथकाने घेतली आहे. यामध्ये संशयित आरोपी अंकुश रामू शिंदेविरूध्द गुंगीकारक औषधी द्रव्य अणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) सन 1985 चे कलम 20 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

Back to top button