सोलापूर : आमदार संजय मामा शिंदे यांच्या फार्महाऊसवर झाली नेत्यांची बैठक | पुढारी

सोलापूर : आमदार संजय मामा शिंदे यांच्या फार्महाऊसवर झाली नेत्यांची बैठक

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा

आगामी होणाऱ्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी करमाळाचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या फार्महाऊसवर नेत्यांची आज (शुक्रवार) बैठक झाली. या बैठकीमध्ये जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन प्रशांत परिचारक यांची उपस्थिती होती. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सर्वपक्षीय नेत्यांनी केला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

जिल्हा दूध उत्पादक प्रक्रिया संघाची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ही निवडणूक सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन बिनविरोध करण्याचा निर्णय यापूर्वी झालेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या निवडणुकांचे नियोजन यापूर्वी दिवंगत नेते सुधाकर परिचारक विजयसिंह मोहिते पाटील तसेच दिवंगत नेते गणपतराव देशमुख हे सर्व एकत्रित येऊन करत होते. मात्र यंदा माजी आमदार दिलीप माने यांच्या फार्महाऊसवर झालेल्या हुरडा पार्टी आणि बैठकीत ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे व माजी मंत्री दिलीप सोपल या दोन नेत्यांवर जबाबदारी आणि नेतृत्व सोपवण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या फार्महाऊसवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक शुक्रवारी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार बबनदादा शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे, सांगोल्याचे नेते चंद्रकांत देशमुख, मंगळवेढ्याचे बबनराव आवताडे, पंढरपूरचे भगीरथ भालके यांच्यासह विशेष उपस्थिती होती ती म्हणजे विधानपरिषदेचे आमदार प्रशांत परिचारक हे उपस्थित होते.

बऱ्याच दिवसांनंतर प्रशांत परिचारक मालक संजयमामा यांच्यासोबत दिसून आले. या बैठकीमध्ये जिल्हा दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्याचे नियोजन आहे. तसेच 17 जागांपैकी कोणत्या तालुक्याला किती जागा द्यायच्या हेसुद्धा निश्चित केले जाणार असल्याचे सांगण्यात येते. निवडणुकीचा अर्ज छाननी मध्ये दूध संघाचे माजी अध्यक्ष दिलीप माने यांचा अर्ज मात्र बाद ठरविण्यात आला आहे. त्यांनी पुण्याचे विभागीय उपनिबंधक डॉ. महेश कदम यांच्याकडे अपील केले आहे. त्या अपिलाचा अद्यापही निर्णय झालेला नाही.

Back to top button