भंडारा : लाखांदूर तालुक्‍यात कोरोनामुळे नव्हे, तर चक्क वाघामुळे 'लॉकडाऊन' ! काय आहे प्रकरण ? | पुढारी

भंडारा : लाखांदूर तालुक्‍यात कोरोनामुळे नव्हे, तर चक्क वाघामुळे 'लॉकडाऊन' ! काय आहे प्रकरण ?

भंडारा ; पुढारी वृत्‍तसेवा : कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन हा शब्द पर्वलीचा झाला. मात्र आता करोना प्रादुर्भाव कमी आहे आणि लॉकडाऊनही नाही. तरी सुद्धा लाखांदूर तालुक्यातील काही गावांमध्ये सूर्यास्तानंतर लॉकडाऊन सारखी स्थिती निर्माण झाली आहे. याला कारण ठरलेत वाघोबा. हो तुम्‍ही नीट वाचलत वाघोबा. वाघाच्या नियमित संचारामुळे ही स्‍थिती निर्माण झाली आहे. वाघाच्या दहशतीमुळे येथील गावकरी सूर्यास्तानंतर घरात बंदिस्त होत आहेत. या गावांमध्ये अलिखित संचारबंदीचे चित्र निर्माण झाले आहे.

लाखांदूर तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून पट्टेदार वाघ व बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. २७ जानेवारीच्या पहाटे दहेगाव जंगलात सरपण गोळा करणाऱ्या प्रमोद चौधरी याला बिबट्याने ठार केले. या घटनेमुळे गावकरी कमालीचे हादरले आहेत. तत्पूर्वी, ३१ डिसेंबर रोजी दोनाड येथे वाघ आल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली होती. वनविभागाने शोधमोहीम सुरूच ठेवली, मात्र काहीच हाती आले नाही.

४ व ५ जानेवारीला पाहूनगाव येथे हिंस्त्र प्राण्यांनी शेळ्या ठार केल्याच्या घटना घडल्या. नंतर सरांडी बु. व मांढळ शेतशिवारात ९ जानेवारीला हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात तीन महिला जखमी झाल्या. १४ जानेवारीला डोकेसरांडी येथील पशुपालकाच्या तीन शेळ्या ठार झाल्याची घटना घडली. त्यामुळे विरली बु, ढोलसर, राजनी, करांडला, मांढळ किरमटी, सरांडी बु. परिसरात शेती काम करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

त्यानंतर चप्राड पहाडी, इंदोरा, मेंढा परिसरात तीन बिबट्यांचे गावकऱ्यांना दर्शन झाले. १ फेब्रुवारीला समाज माध्यमांवर एका पट्टेदार वाघाचा व्हिडिओ व्हायरल झाला. सदर पट्टेदार वाघ हा चिंचोली परिसरात असल्याची माहिती पसरविण्यात आली. त्यानंतर वन विभागाने याची दखल घेत शहानिशा केली, मात्र असा रस्ता किंवा व्हिडिओत दाखवलेले ठिकाण तालुक्यात आढळून आले नाही, असे वनविभागाने सांगितले.

मात्र, वाघाचा व्हिडिओ तालुक्यातील गावागावातील सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि पुन्हा लोकांच्या मनात वाघाची दहशत निर्माण झाली. त्यामुळे झरी, मुर्झा, मालदा, पारडी, मुरमाडी, दहेगाव, पिंपळगाव/ को, दांडेगाव, चिचोली, चिचगाव, पुयार, मढेघाट, कन्हाळगाव, चपराळ, मेंढा, इंदोरा, परसोडी, कुडेगाव, गवराळा, रोहिणी, राजनी, सरांडी बु., ओपारा, पाहूनगाव, डोकेसरांडी इत्यादी गावांमध्ये जाणारे अंतर्गत रस्ते सूर्यास्त होताच बंद होत आहेत.

याचा फटका लाखांदूर या तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या आथली, असोला, भागडी, परिसरातील व्यावसायिकांवर सुद्धा झाला आहे. त्यामुळे लाखांदूर येथेही सायंकाळी सहा वाजल्‍या नंतर आवागमन पूर्णत: कमी झाली आहे. काही गावातील अंतर्गत मार्गच सायंकाळी पाच ते सकाळी आठ या कालावधीसाठी बंद झाल्याचे चित्र आहे.

लाखांदूर तालुक्यात घडलेल्या या घटनांमागे वाघच असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे संध्याकाळ होताच गावकरी स्वत:ला घरातच कोंडून ठेवत आहेत. कोरोना काळात लॉकडाऊन असतानाही गावकरी लॉकडाउन कसा असतो, हे बघण्यासाठी बाहेर पडत होते. आता तशी स्थिती नसतानाही वाघाच्या दहशतीमुळे गावकरी घराबाहेर पडण्याचे धाडस करत नाहीत.

तथापी, बिबट्याचे वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले असून, जंगलाला लागून असलेल्या गावातील ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन वन विभागाने केले आहे.

Back to top button