कराड : राष्ट्रीय महामार्गाला ‘कचरा डेपो’ चे स्वरुप

कोयना पुलाच्या उत्तर बाजूला कचर्‍याचे साम्राज्य...
कोयना पुलाच्या उत्तर बाजूला कचर्‍याचे साम्राज्य...

कराड : पुढारी वृत्तसेवा

देशात स्वच्छ सर्वेक्षणमध्ये अग्रेसर असणार्‍या कराड शहरालगतच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर कचर्‍याचे साम्राज्य पहावयास मिळते. शहरालगतच्या ग्रामपंचायतीचे स्थानिक ग्रामस्थांवर नियंत्रण नसल्याने अस्ताव्यस्तपणे कचरा टाकला जातो. कराड – मसूर मार्ग, कराड – विटा मार्ग वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. हे कमी होते की काय म्हणून पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत गोटे, खोडशी गावच्या हद्दीसह पाटण तिकाटणे परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. कोल्हापूर नाका परिसरात नवीन कोयना पुलालगत तर भयावह परिस्थिती आहे. या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. अशीच परिस्थिती पाटण तिकाटणे परिसरात मागील काही वर्षापासून पहावयास मिळते. त्याचबरोबर गोटे व खोडशीनजीकही महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. महामार्गाखाली मोठ्या पाईप टाकून महामार्गाच्या पश्‍चिम बाजूकडील पाणी पूर्व बाजूला काढून देण्यात आले आहे. मात्र या पाईप लाईन कचरा व गाळामुळे भरल्या असून पाणी वाहून जाण्यास जागाच राहिलेली नाही, असेही पहावयास मिळते. रस्ते विकास महामंडळ आणि राज्य शासन ज्याप्रमाणे टोल वसुलीवर कटाक्षाने लक्ष देते. त्या तुलनेत महामार्गावर वाहन चालकांना मिळणार्‍या सुविधांकडे लक्ष का देत नाही? महामार्गाला कोणी वाली आहे का ? असा प्रश्‍न उपस्थित होतो.

कोयना पुलाच्या उत्तर बाजूला कचर्‍याचे साम्राज्य…

कोयना पुलाच्या उत्तर बाजूला कचर्‍याचे साम्राज्य…
कोयना पुलाच्या उत्तर बाजूला कचर्‍याचे साम्राज्य…

कोल्हापूर नाक्यावरून सातार्‍याच्या दिशेने जात असताना कोयना पूल क्रॉस करून उड्डाण पुलाकडे जात असतानाच महामार्गालगत मोठ्या प्रमाणावर अस्ताव्यस्तपणे कचरा टाकलेला पहावयास मिळतो. प्लास्टिक, हॉटेलमध्ये राहिलेले शिळे अन्न अस्ताव्यस्तपणे टाकलेले असते. जोरदार वार्‍यामुळे अनेकदा प्लास्टिक तसेच अन्य कचरा वाहन चालकांच्या अंगावर उडतो. या परिसरात वाहने भरधाव वेगात असतात आणि अनेकदा मोकाट कुत्री दुचाकी तसेच अन्य वाहनांच्या आडवी येतात. त्यामुळेच अपघाताचा धोका निर्माण होतो आणि असे असूनही रस्ते विकास महामंडळ आणि स्थानिक ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

महामार्गाच्या पूर्व बाजूला कचर्‍याचे ढीग…

महामार्गाच्या पूर्व बाजूला कचर्‍याचे ढीग…
महामार्गाच्या पूर्व बाजूला कचर्‍याचे ढीग…

सातारा बाजूकडून कराडच्या दिशेने येत असताना खोडशीपासून पुढे आल्यानंतर सेवा रस्त्यालगत काही ठिकाणी कचरा टाकून देण्यात आलेला पहावयास मिळतो. महामार्गावरील मुख्य लेनलगत कचरा टाकला जात असून अनेकदा वार्‍यामुळे कचरा महामार्गावरही येतो. महामार्ग हेल्पलाईन कक्षाकडून गस्त घातली जाते. मात्र त्यांच्याकडूनही कचरा टाकणार्‍या नागरिकांना समज दिली जात नाही. तसेच स्थानिक ग्रामपंचायतीकडूनही योग्य ती कार्यवाही होत नाही. त्यामुळेच दिवसेंदिवस महामार्गालगत कचर्‍याचे साम्राज्य वाढत आहे. तसेच यामुळे परिसराचे विद्रुपीकरण होत असून वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

नाल्यात मातीचे ढीग अन् कचरा…

नाल्यात मातीचे ढीग अन् कचरा…
नाल्यात मातीचे ढीग अन् कचरा…

गोटे गावाकडून खोडशीकडे जात असताना महामार्गालगत पाणी वाहून जाण्यासाठी सेवा रस्ता व मुख्य लेन यामध्ये नाला काढण्यात आला आहे. या नाल्यात झाडाझुडपांचे साम्राज्य पहावयास मिळते. काही ठिकणी मातीचे ढीग असून पाणी वाहून जाण्यास जागाच शिल्लक राहिलेली नाही. अशातच कचराही टाकला जातो. त्यामुळेच पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर सेवा रस्त्यावर पाणी साचून राहते आणि सेवा रस्त्यावरील वाहतूक संपूर्ण पावसाळ्यात ठप्प होते. तसेच पाणी साचून राहिल्याने सेवा रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्थाही होते.

कराडसह मलकापूर नगरपालिकेचा निष्काळजीपणा…+-

कराडसह मलकापूर नगरपालिकेचा निष्काळजीपणा…
कराडसह मलकापूर नगरपालिकेचा निष्काळजीपणा…

कोल्हापूर नाका परिसरातील पंकज हॉटेलसमोरचा काही भाग मलकापूरमध्ये तर काही भाग कराड शहरात समाविष्ट आहे. या परिसरात वास्तव्यास असणारे नागरिक कोयना पुलास प्रारंभ होतो, त्या परिसरात वर्षानुवर्ष कचरा टाकतात. याच विषयावर या परिसरातील नागरिकांनी यापूर्वी कराडच्या मुख्याधिकार्‍यांचे वारंवार लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आजवर कार्यवाही झालेलीच नाही. मलकापूर नगरपालिकेकडून कचरा गोळा केला जात नसल्याने नागरिक या परिसरात कचरा टाकतात, असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

ओढ्याजवळील कचरा जातो थेट नदीत…

ओढ्याजवळील कचरा जातो थेट नदीत…
ओढ्याजवळील कचरा जातो थेट नदीत…

मागील वर्षी खोडशीनजीक महामार्गावर पाणी साचून राहिल्याने सातारा बाजूकडे जाणार्‍या लेनवरील वाहतूक ठप्प झाली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी येथील एका युवकाची कार पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेली होती. याच परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचून पाण्याच्या प्रवाहामुळे कचरा थेट नदीपर्यंत वाहून जातो. त्यामुळेच कृष्णा नदीही प्रदुषित होते. त्यामुळेच तालुका प्रशासनाने कठोर भूमिका घेत संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाला सक्तीने बेशिस्त नागरिकांवर कारवाई करण्याची सूचना करणे आवश्यक आहे. मोकाट कुत्र्यांचा वावर असल्याने दुचाकी चालकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो आणि अनेकदा अपघातही होतात.

हेही वाचलतं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news