बंगळूर ; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकातील सरकारी कॉलेजमध्ये विद्यार्थिनींना बुरखा अर्थात हिजाब घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यावरून हिजाब समर्थक आणि विरोधक असे दोन गट पडले असून, बहुतांशी सरकारी तसेच खासगी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांत संघर्ष सुरू झाला आहे. (Hijab vs Bhagwa)
हिजाबला विरोध म्हणून अनेक विद्यार्थी भगवे शेले घालून कॉलेजमध्ये जात आहेत. त्यात शिमोगा जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये राष्ट्रध्वजाच्या स्तंभावर भगवा ध्वज फडकविण्यात आला, तर विद्यार्थ्यांच्या दोन गटांत दगडफेक झाली. त्यात एक विद्यार्थी जखमी झाला.
परिणामी हा संघर्ष आणखी चिघळू नये यासाठी बुधवार (दि.9) पासून कर्नाटकातील सर्व महाविद्यालये तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. शाळा मात्र सुरू राहतील.
दरम्यान, हिजाब घालून कॉलेजमध्ये येण्यास कॉलेज व्यवस्थापनाने बंदी घातल्यानंतर पाच विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली असून, पुढची सुनावणी बुधवारी होणार आहे.
हिजाब घालून आल्यानंतर उडपी, कुंदापूर, चिक्कमंगळूर या शहरांमधील कॉलेज व्यवस्थापनांनी या विद्यार्थिनींना कॉलेजच्या गेटवरूनच परत पाठवले. त्यानंतर त्यातील काही विद्यार्थिनींनी न्यायालयात याचिका दाखल करून हिजाब हा आमचा हक्क असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, हिजाबला विरोध करत गेले तीन दिवस काही विद्यार्थ्यांचे गट भगवे शेले घालून कॉलेजला जात आहेत. त्यातच मंगळवारी हा वाद शिगेला पोहोचला. शिमोग्यातील बापूजीनगरातील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयात हिजाब आणि भगवा शेला धारण करून विद्यार्थी आले होते. त्यांच्यात घोषणाबाजी, एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. तुफान दगडफेक सुरू झाली. यामध्ये एक विद्यार्थी जखमी झाला.
काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील राष्ट्रध्वजाच्या स्तंभावर भगवा ध्वज फडकविला. यामुळे स्थिती आणखी चिघळली. घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीमार केला. त्यानंतर तत्काळ जमावबंदी लागू केली.
कोणत्याही कारणास्तव विद्यार्थिनींना हिजाब धारण करून महाविद्यालयात प्रवेश देऊ नये. त्यांना प्रवेश देण्यात आल्यास भगवा शेला आणि फेटा बांधून महाविद्यालयात प्रवेश केला जाईल, असा इशारा विद्यार्थ्यांच्या एका गटाने दिला आहे. काही विद्यार्थी गळ्यात भगवा शेला घालून आले होते. हिजाब घातलेल्या विद्यार्थिनींना वर्गात प्रवेश दिल्याने आपल्यालाही प्रवेश देण्याची मागणी त्यांनी केली. त्यांना अडविण्यात आल्याने ढकलाढकली झाली.
शाब्दिक चकमकीनंतर तणाव निर्माण झाला. काही वेळातच दगडफेक सुरू झाली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी विद्यार्थ्यांवर लाठीमार करून जमाव पांगवला.
चिक्कमंगळुरातही हिजाब आणि भगवा शेला धारण केलेल्यांमध्ये वाद झाला. प्राचार्यांनी समेटाचा प्रयत्न केला. अखेरीस हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींनी वर्गावर बहिष्कार घातला. मंड्यामध्ये महाविद्यालय व्यवस्थापनांनी खबरदारी घेऊन काही निर्बंध लागू केले होते. त्यामुळे स्थिती बिघडली नाही. विजापुरातील चडचण बसवेश्वर महाविद्यालयात हा वाद उफाळला. प्राचार्य आणि व्यवस्थापन मंडळाने विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला.
दिवसभर राज्यभरात हे प्रकार सुरू राहिल्यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तातडीने सर्व महाविद्यालये तीन दिवस बंद ठेवण्याचा आदेश दिला. त्यानुसार अकरावी, बारावी तसेच सर्व पदवी महाविद्यालये, पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग महाविद्यालये पुढचे तीन दिवस बंद राहणार आहेत.
बुरखा अर्थात हिजाबप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मंगळवारी खंडपीठाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला. बुधवारी (दि.9) दुपारी 2.30 वाजता सुनावणी सुरू राहील, असे सांगितले. तोपर्यंत राज्यातील विद्यार्थी, नागरिकांनी संयम व शांतता राखावी, असे आवाहन केले.
हिजाब घालून वर्गात बसण्याची परवानगी देण्याची मागणी करून काही विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर अॅडव्होकेट जनरल प्रभूलिंग नावदगी यांनी युक्तिवाद केला.
गणवेश लागू करणे हा प्रत्येक महाविद्यालयाच्या स्वायत्ततेचा प्रश्न आहे. त्यामध्ये सरकार मध्यस्थी करणार नाही. कॉलेज सुधारणा मंडळांनी यावर ठोस निर्णय घ्यावा, असे नावदगी म्हणाले.
याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. देवदत्त कामत यांनी कुराणमध्ये हिजाब घालण्याचा नियम असून, त्याचे पालन न केल्यास शिक्षेची तरतूद असल्याची माहिती दिली. कपडे घालण्याच्या बाबतीत सर्वांना स्वातंत्र्य आहे. घटनेच्या कलम 19 (1) नुसार असणारा विद्यार्थिनींचा हक्क सरकारकडून हिरावून घेतला जात असल्याचा दावा अॅड. कामत यांनी केला.
दोन्ही बाजूंकडील युक्तिवाद ऐकून न्यायमूर्ती कृष्ण दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा संवेदनशील विषय असून, सर्वांनी शांतता राखावी, असे सांगत पुढील सुनावणी बुधवारी दुपारी 2.30 वाजता होणार असल्याचे जाहीर केले.