सातारा-माढ्याचा खासदार नरेंद्र मोदींच्याच विचारांचा | पुढारी

सातारा-माढ्याचा खासदार नरेंद्र मोदींच्याच विचारांचा

सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या राजकारणात सातार्‍याने ठसा उमटवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने महायुतीतील सर्व घटकपक्ष एकत्र आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वधर्मसमभाव नरेंद्र मोदींनी आचरणात आणला व रुजवला. संपूर्ण जगात नरेंद्र मोदी यांनी भारताचा लौकिक वाढवला. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. सातारा तसेच माढा लोकसभा मतदारसंघाचा खासदार मोदींच्याच विचारांचा असेल, असा निर्धार सातार्‍यातील ऐतिहासिक गांधी मैदानावरील महायुती मेळाव्यात केला. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्यासारखे व्हिजन असलेला दुसरा नेता देशात नाही. नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नसल्यामुळे सातारा जिल्ह्याने त्यांचा विचार बळकट करावा, असे आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.

सातार्‍यातील गांधी मैदानावर महायुतीचा जिल्हास्तरीय मेळावा पार पडला. या मेळाव्यास पालकमंत्री शंभूराज देसाई, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, आ. दीपक चव्हाण, जि.प.चे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी आमदार आनंदराव पाटील, नरेंद्र पाटील, डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, बाळासाहेब सोळसकर, अमित कदम, धैर्यशील कदम, पुरूषोत्तम जाधव, चंद्रकांत जाधव, अशोक गायकवाड, चित्रलेखा माने कदम, सुरभी भोसले, विक्रमबाबा पाटणकर, राजेश पाटील, दत्तानाना ढमाळ, सुनील काटकर, काका धुमाळ आदी प्रमुख उपस्थित होते.

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले म्हणाले, महायुतीतील सर्व राजकीय पक्ष नरेंद्र मोदी यांच्या विचाराने एकत्र आले आहेत. मतदार असलेल्या लोकशाहीतील राजांनी आम्हा लोकप्रतिनिधींना पदावर बसवले आहे. आपल्या आमदार, खासदार व पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून विकासकामे मार्गी लागावीत असे लोकांना वाटते. त्यामुळे महायुतीचा मेळावा हा विकासपूर्तीचा मेळावा असे म्हटले तर वावगे वाटणार नाही. देशात अनेक पंतप्रधान पाहिले, त्यांच्याशी परिचय झाला. वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी चर्चा झाली. ते मोठ्या मनाचे होते. पण वस्तुस्थितीत रुपांतर होत नाही तोपर्यंत लोकांना त्याची पोहोचपावती मिळत नाही. नरेंद्र मोदी यांच्याशी अनेकदा चर्चा झाली. त्यांच्याकडे प्रत्येक क्षेत्राशी संबंधित बारकावे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभावाची संकल्पना मांडली. त्यांचेच विचार आचरणात आणण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले. त्यांच्यामुळे संपूर्ण जगभरात देशाचा लौकिक वाढत आहे. देशाला वलय निर्माण झाले आहे.

मात्र नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौर्‍यावर विरोधकांकडून टीका केली जायची. भारत आणि इतर देशांमध्ये कम्युनिकेशन गॅप होता, तो नरेंद्र मोदींनी दूर केला. देशादेशांसोबत त्यांनी संवाद साधला. त्यामुळे भारत देश वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. सर्व पदाधिकारी नरेंद्र मोदी यांच्याच विचाराने एकत्र आलो आहोत. मोदी हे आशेचे किरण आहेत. लोकांचे अनेक वर्षांपासूनचे प्रश्न सोडवले जाणार आहेत. लोकसभेला उमेदवार कोण आहे हे महत्त्वाचे नाही. सातारा किंवा माढा लोकसभा मतदारसंघात जो कोणी उमेदवार असेल तो नरेंद्र मोदींच्या पाठीशी उभा राहणारा, त्यांच्या विचारांचा असेल.एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्त्वामुळे संपूर्ण राज्यातून सर्व 48 खासदार नरेंद्र मोदी यांच्याच विचाराचे निवडून येतील यात शंका नाही. स्वार्थासाठी नव्हे तर जनतेला केंद्रबिंदू मानून आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत.

ना. शंभूराज देसाई म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शहरी तसेच ग्रामीण भागाचा विकास झाला. कृषी, औद्योगिक व इतर क्षेत्रांसाठी धोरणात्मक निर्णय घेतले. कायद्यात बदल करुन साखर कारखान्यांना इन्कम टॅक्समधून वगळण्यात आले. त्याचा फायदा शेतकर्‍यांना झाला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जी 20 अंतर्गत देशात 20 देशांचे संमेेलन झाले. भारताने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे सहभागी देशांनी कौतुक केले. एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यावर मुंबईत झालेल्या अमुलाग्र बदलाचे कौतुकही या देशांनी केले. रात्री कधीही गेला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरवाने सर्वसामान्यांसाठी उघडे असतात. मागील अडीच वर्षात वर्षा बंगल्यावर जायचं म्हटल तरी अनेक गेट ओलांडूनही प्रवेश मिळेल की नाही शंका होती,अशी टीका त्यांनी केली. गेल्या पावणे दोन वर्षात 44 हजार कोटींची मदत शेतकर्‍यांना केली. महात्मा फुले कर्जमाफी योजनेतून 17 हजार कोटी शेतकर्‍यांना दिले. गेल्या अडीच वर्षात राज्यात केवळ 2 प्रकल्पांनाच प्रशासकीय मंजुरी मिळाली.

मात्र महायुती सरकारने 29 प्रकल्पांना मंजुर्‍या दिल्याने साडे सात लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. जिहे-कठापूर योजनेला निधी दिला. महिलांना एसटी बस प्रवासात 50 टके सवलत दिली. अंगवाडी सेवकांना 1 हजार 500 तर मदतनीस यांना 700 रुपयांची वाढ केली. दाओस बैठकीत 1.75 लाख कोटींची परकीय गुंतवणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणली. जिल्ह्यात सैनिक स्कूल, मेडिकल कॉलेजचे काम गतीने सुरु आहे. प्रतापगड विकासासाठी 200 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायतींना मोठ्या प्रमाणावर निधी देण्यात येत आहे. शिवप्रतापदिनी प्रतापगडावरील अतिक्रमण हटवण्यात आले. सर्व घटक पक्षांना घेऊन निवडणुकांना सामोरे जाऊया, असे आवाहन त्यांनी केले.

इतर राज्यांप्रमाणेच मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या : खा. उदयनराजे

लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी, लोकांचा उत्कर्ष करण्यासाठी आम्ही कार्यरत आहे. लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वांचा प्रयत्न आहे. राज्यात ओबीसी-मराठा वाद निर्माण झाला आहे. इतर राज्यांनी आरक्षणात वाढ केली आहे. राज्य शासनाने पुढाकार घेऊन कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता सर्वांचा आरक्षणात समावेश करून घ्यावा. सर्व समाजांना न्याय मिळावा, यासाठी सरकार निश्चित पाऊल उचलेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Back to top button