वाईतून बंदूक-गोळ्यांचा साठा जप्त | पुढारी

वाईतून बंदूक-गोळ्यांचा साठा जप्त

सातारा, पुढारी वृत्तसेवा : पोलिस रेकॉर्डवरील अविनाश मोहन पिसाळ (मूळ रा. बावधन सध्या रा. बावधन नाका, ता. वाई) याच्या घरावर सातारा पोलिसांनी छापा टाकल्यानंतर बेकायदा बंदुका, गोळ्या, तलवारी व वन्यप्राण्याचे शिंग, नख याचे घबाडच सापडले. 6 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करत संशयिताला अटक केली. दरम्यान, या कारवाईनंतर वाई परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संशयित मोहन पिसाळ हा बंदूक विक्री करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला (एलसीबी) समजली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून संशयिताला बावधन येथून ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीमध्ये संशयिताने बंदूक, गोळ्या वाईतील बावधन नाका येथील फ्लॅटमध्ये असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी पाहणी केली.

बावधन नाक्यावरील फ्लॅटमध्ये 3 गावठी पिस्टल, 2 गावठी कट्टे, 78 जिवंत काडतुसे, काडतुसाच्या 370 रिकाम्या पुंगळ्या, 2 तलवारी, वन्यजीव प्राण्याची शिंगे, वाघाचे नख असा मुद्देमाल होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व मुद्देमाल जप्त केला असता तो 6 लाख 20हजार 300 रुपये किंमतीचा असल्याचे समोर आले. पोलिसांनी संशयितावर आर्म अ‍ॅक्टप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. एलसीबी पोलिसांनी संशयित व मुद्देमाल वाई पोलिसांकडे वर्ग केला.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अरुण देवकर, सपोनि सुधीर पाटील, रवींद्र भोरे, फौजदार पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, मदन फाळके, पोलिस विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, प्रवीण फडतरे, अविनाश चव्हाण, अरुण पाटील, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, मयूर देशमुख, पंकज बेसके यांनी कारवाईत सहभाग घेतला.

प्रथमच मोठी कारवाई

अविनाश पिसाळ याच्यावर पोलिसांनी शस्त्र अधिनियम व वन्यजीव सरंक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. सातारा जिल्ह्यात एकाच व्यक्तीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्राचा साठा सापडल्याची पहिली घटना समोर आली आहे. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? शस्त्रं कुठून आणली? शिंग कोणत्या प्राण्याची आहेत? असे सवाल उपस्थित झाले आहेत.

Back to top button