घनकचरा व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर; महाबळेश्वर राज्यातील पहिली नगरपालिका | पुढारी

घनकचरा व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर; महाबळेश्वर राज्यातील पहिली नगरपालिका

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर नगरपालिका ही घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरणारी राज्यातील पहिली नगरपालिका ठरली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून हिलदारी अभियानाअंतर्गत स्त्री मुक्ती संघटना व रिसीटी नेटवर्क प्रा.लि. यांच्या सहकार्याने महाबळेश्वर पालिका इतर गावांमध्ये शाश्वत घनकचरा व्यवस्थापनासाठी विविध उपक्रम राबवत आहे. यात स्थानिक लोकांमध्ये कचरा वर्गीकरणाबाबत नावीन्यपूर्ण माध्यमातून जनजागृती करणे, सफाई मित्रांसाठी विविध प्रशिक्षण, आरोग्य तपासणी शिबिर, सुरक्षा साधनांचे वाटप, स्वच्छता मोहीम असे उपक्रम समाविष्ट आहेत.

रिसीटी नेटवर्कद्वारे पालिकेने शाश्वत घनकचरा व्यवस्थापनासाठीसुद्धा तंत्रज्ञानाची मदत घेतली आहे. तंत्रज्ञानाद्वारे शहरातील सर्व आस्थापनांचा डिजिटल सर्वे करण्यात आला. प्रत्येक घर, दुकान, हॉटेल यांना क्यू.आर. कोडने जोडण्यात आले. यानंतर घंटागाडीच्या ड्रायव्हर व हेल्पर यांना मोबाईल फोन देऊन यात रिसीटीच्या वेस्ट इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी वापराबाबत त्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
आता दररोज कचरा गोळा करताना घंटागाडीवरील ड्रायव्हरमार्फत शहरात लावलेले क्यू.आर. कोड स्कॅन करण्यात येतात यातून संबंधित भागधारकाने कचरा दिला अथवा नाही आणि दिला असेल तर तो वर्गीकृत आहे अथवा नाही, याची नोंद रिसीटी अ‍ॅप्लिकेशनमध्ये होते. यामुळे शहरातील कचर्‍याचे संकलन व वर्गीकरण याबाबत प्रशासनाला एका क्लिकवर माहिती मिळते. हिलदारीचे डॉ. मुकेश कुलकर्णी यांनी सांगितले की, रिसीटीचे तंत्रज्ञान यशस्वीपणे उपयोगात आणणारी महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद ही राज्यातील पहिली नगरपालिका आहे.

गत दोन वर्षांपासून नगरपालिका रिसीटी वेस्ट इंटेलिजन्स टेक्नॉलॉजीच्या मदतीने शहरातून गोळा होणार्‍या कचर्‍याचे मॉनिटरिंग
करते आहे.
– पल्लवी पाटील, मुख्याधिकारी, महाबळेश्वर पालिका

Back to top button