सातारा : महायुतीचा महाविजय होणारच : खा. उदयनराजे | पुढारी

सातारा : महायुतीचा महाविजय होणारच : खा. उदयनराजे

लिंब, पुढारी वृत्तसेवा : येत्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील 288 आमदार आणि 48 खासदार हे या भाजपप्रणीत महायुतीचेच निवडून येणार आहेत, यात शंका नाही. राज्यात महायुतीचाच महाविजय होणार आहे, असा विश्वास खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

सातारा लोकसभा मतदार संघातील टिफिन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस आ. जयकुमार गोरे, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावस्कर, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ, सुरभी भोसले, रंजना रावत, सुनील काटकर, बाळासो गोसावी, भरत राऊत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

खा. उदयनराजे म्हणाले, जनतेला विकासापासून, प्रगतीपासून काँग्रेस व विरोधी पक्षांनी वंचित ठेवले आहे. भाजप महायुतीच्या पाठीशी 70 टक्के जनता आहे. त्यामुळे आपण महाविजय मिळवणारच. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपप्रणीत सरकार आज सत्तेत आहे. पंतप्रधान मोदी यांनी राबवलेल्या विकासाच्या योजना आपण तळागाळात राबवल्या तर महाविजय मिळवल्याशिवाय आपण राहणार नाही.

आ. जयकुमार गोरे म्हणाले, खा. उदयनराजे भोसले हे जिल्ह्यातच नव्हे तर राज्य पातळीवर कार्यरत राहिलेले दिसले पाहिजे, ते मला आज दिसत आहेत. त्यामुळे मी आज खूप आनंदी आहे. ज्या राज्यात फक्त छत्रपतींचा आदेश चालतो त्याच छत्रपतींच्या वारसदारांनी आजच्या टिफिन बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीस महत्त्व आले आहे. आता मंत्रिमंडळाचे खाते वाटप झाले आहे. त्यामुळे आपल्यातील अनेक जण चिंतेत आहेत; मात्र तुम्ही काळजी करू नका. या मंत्रिमंडळाचे हाय कमांड हे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे कोणाला कोणतेही खाते असूद्या काही अडचण येणार नाही.

सुरभी भोसले, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, विक्रम पावस्कर आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा तसेच विविध मतदार संघात उत्कृष्ट काम केलेल्या पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी कराड तालुक्यातील काही पदाधिकार्‍यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले.

Back to top button