सातारा : जिल्ह्यात 201 गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार’ | पुढारी

सातारा : जिल्ह्यात 201 गावांमध्ये ‘जलयुक्त शिवार’

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील टंचाईसदृश तालुक्यांतील 210 गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान 0.2 राबवण्यात येणार आहे. अटल भूजल योजनेतील 70 गावांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. जिल्हा मृद व जलसंधारण विभागाकडून राबवण्यात येणार्‍या या अभियानाद्वारे शिवार फेर्‍या घेण्यात आल्या आहेत. लवकरच जलसंधारण कामांना सुरूवात करण्यात येणार आहे.

पावसाची अनियमितता व पावसातील खंड, त्यामुळे पाणीटंचाई सदृश परिस्थिती निर्माण होऊन त्याचा कृषी क्षेत्रावर मोठा परिणाम होतो. त्यातच सिंचनाच्या मर्यादित सुविधा, अवर्षणप्रवण क्षेत्राची व्याप्ती, हलक्या जमिनीचे जादा प्रमाण यामुळे कृषी क्षेत्रात वाढत जाणारी अनिश्चितता या प्रमुख बाबींचा विचार करून टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी 2015 ते 2019 यादरम्यान राज्य शासनाने जलयक्त शिवार अभियान राबवले. या अभियानाची सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांमध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली. या अभियानामुळे बहुतांश गावे जलस्वयंपूर्ण झाली. हे अभियान यशस्वी करण्यात त्या-त्या काळातील जिल्हाधिकार्‍यांनी मोठे योगदान दिले. जिल्हा प्रशासनाने हिरिरीने सहभाग घेतल्याने जलयुक्त शिवार अभियान ही लोकचळवळ बनवली.

या अभियानाचे चांगले परिणाम दिसून येत असले तरी झालेल्या कामांची देखभाल करणेही आवश्यक आहे. त्यादृष्टी राज्य शासनाने पुन्हा राबवलेले जलयुक्त शिवार अभियान 2.0 हे महत्त्वाचे ठरणारे आहे. या अभियानांतर्गत जलसंधारणाच्या सर्व योजनांमध्ये समाविष्ट असलेल्या गावांमध्ये झालेल्या कामांची देखभाल व दुरुस्ती करणे, मूलस्थानी जलसंधारणाचे उपचार राबवणे, सूक्ष्म सिंचनाचा वापर वाढवणे, पाण्याच्या ताळेबंदाच्या माध्यमातून जलसाक्षरता वाढवणे अशा उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत. त्याशिवाय पाणी अडवून भूजल पातळी संरक्षित करणे, विकेंद्रित जलसाठे निर्माण करणे, पिकांसाठी संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे, जुन्या जलस्रोतांची साठवण व देखभाल करणे आदि कामे करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 130 गावांचा समावेश करण्यात आला होता. मात्र अटल भूजल योजनेतील 70 गावांचाही या अभियानात समावेश करण्यात आला आहे. या अभियानात समाविष्ट गावांमध्ये शिवार फेर्‍या झाल्या असून तंत्रशुद्ध आराखडे तयार करण्यात येत आहेत. काम मंजुरीसाठी आवश्यक प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाली असून कामांना लवकरच सुरुवात केली जाणार आहे.

जलसंधारण कामांवर समित्यांचा वॉच

जलयुक्त शिवार अभियानातून केल्या जाणार्‍या कामांचा आढावा, नियंत्रण व अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली तर तालुकास्तरावर प्रांताधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय समितीचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी हे सहअध्यक्ष असतील. जिल्हा जल व मृद संधारण अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. उपवनसंरक्षक, उपजिल्हाधिकारी (रोहयो), कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा), वरिष्ठ भूवैज्ञानिक (भूजल सर्वेक्षण), विभागीय वन अधिकारी, कार्यकारी अभियंता (जलसंपदा), कार्यकारी अभियंता (लपा), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तज्ज्ञ व्यक्ती किंवा संस्थेचे प्रतिनिधी यांचा सदस्य म्हणून समावेश असेल. कामांची गुणवत्ता व पारदर्शकता राखणे ही जबाबदारी या समित्यांवर राहणार आहे.

Back to top button