सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत इंगळेवाडी येथील युवक ठार | पुढारी

सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत इंगळेवाडी येथील युवक ठार

कण्हेर : पुढारी वृत्तसेवा : सातारा मेढा रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीस ठोकरल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर दुचाकीवरील एक वृद्धा गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात नुने नजीक असलेल्या सातारा-मेढा रस्त्यावरील नंदिचा चढ येथील वळणावर झाला. मंगळवारी रात्री 7.30च्या सुमारास ही घटना घडली.

इंगळेवाडी (ता.सातारा) येथील युवक तानाजी दौलत इंगळे (वय 32) हा व त्याची चुलती यमुना पांडुरंग इंगळे (वय ७२) हे दोघे साताऱ्यातील रुग्णालयात जात होते. वाटेतच नंदीचा चढ येथील वळणावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस ठोकरले. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात तानजी हा जागीच ठार झाला. तर त्याची चुलतीचा पाय तुटून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

अपघाताची माहिती कळताच परिसरातील लोकांनी पाहण्यासाठी गर्दी केली होती. अपघातस्थळी रक्त व मांसाचा सडा पाहून लोकांच्या अंगावर काटे उभे राहत होते. तानाजी हा सातारा येथील प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करत असून त्याला पत्नी व दोन लहान मुले आहेत. घटनास्थळी सातारा तालुक्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे व उपनिरिक्षक एस.व्ही.देव यांच्यासमवेत पोलीस कर्मचारी दाखल झाले होते. जखमीस शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळाचा तालुका पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून अधिक तपास तालुका पोलिस करत आहेत.

Back to top button