मांघरच्या धर्तीवर आता राज्यात इतरत्रही ‘मधाचं गाव’ | पुढारी

मांघरच्या धर्तीवर आता राज्यात इतरत्रही ‘मधाचं गाव’

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे देशातील पहिले ‘मधाचे गाव’ म्हणून विकसित केल्यानंतर येथील अर्थकारण बदलू लागले. याबाबतचे वृत्त दै.‘पुढारी’ने दि. 15 मे 2022 रोजी प्रसिद्ध करून दि. 22 मे रोजी ‘मधाचा अस्सल गावरान ब्रॅण्ड मांघर हनी’ ही संडे स्पेशल स्टोरीही प्रसिद्ध करून नव्या संकल्पनेला झळाळी दिली होती. त्याची राज्य शासनानेही दखल घेतली होती. आता तर राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांघरच्या धर्तीवर राज्यात हा उपक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे त्या त्या गावातील लोकांना कायमचा रोजगार उपलब्ध होवून मधमाशी संवर्धनही होणार आहे.

‘मधाच गाव’ म्हणून उदयास आलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील मांघरचे रूपडे आता पालटले आहे. ‘मांघर हनी’ म्हणून या गावाची नवी ओळख आता समोर आली आहे. हे गाव देशातील पहिले ‘मधाचे गाव’ ठरले. राज्य शासनाच्या या उपक्रमाला दै.‘पुढारी’नेही ठळक प्रसिद्धी दिली होती. गतवर्षी दि. 15 मे रोजी ‘मांघर होणार देशातील पहिले मधाचे गाव’ हे ‘पुढारी विशेष वृत्त’ प्रसिद्ध केले.

ही गावेही होणार आता मधाचं गाव

मांघरच्या धर्तीवर देवडे (रत्नागिरी), बहाडोली (पालघर), शिवरामखेडा (नांदेड), आंबोली (सिंधुदुर्ग), आमझरी (अमरावती), पाटगाव (कोल्हापूर) ही गावेही ‘मधाचं गाव’ म्हणून आता नावारूपास येणार आहेत. राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या संकल्पनेतून हा उपक्रम यशस्वी होत आहे. राज्य सरकारने त्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केल्याची घोषणा ना. देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Back to top button