सातारा: मटका किंग समीर कच्छीसह टोळीला ‘मोका’ | पुढारी

सातारा: मटका किंग समीर कच्छीसह टोळीला ‘मोका’

सातारा; पुढारी वृत्तसेवा :  मटकाकिंग समीर कच्छी याच्यासह त्याच्या 46 साथीदारांवर संघटित गुन्हेगारी (मोका) अंतर्गत कारवाई करण्यात आली. मटका व्यवसाय, व्याजाने पैसे देऊन सावकारी करणे, टोळीची दहशत निर्माण करून आर्थिक व इतर फायद्यासाठी टोळीने अनेक विघातक कृत्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, चिट फंड कलमही या टोळीला लावण्यात आले आहे.

समीर ऊर्फ शमीम सलीम शेख ऊर्फ कच्छी याला दि. 19 फेब्रुवारी रोजी मोळाचा ओढा येथून ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याच्याकडून 16 लाख 26 हजार 70 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी त्याला 22 साथीदारांसोबत ताब्यात घेतले होते. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर संशयित समीर कच्छीने त्याच्या साथीदारांमार्फत मटका, जुगारसारखे अवैध धंदे चालवून मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गोळा केला असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.

समीर कच्छीने गैरमार्गाने गोळा केलेला हा पैसा सामान्य कुटुंबातील गरजू लोकांना बेकायदेशीर व्याजाने देऊन त्याद्वारे सावकारी केली. यातूनच काही जणांची पिळवणूक करत मारहाण केल्याचे
समोर आले. कच्छी याच्याविरोधात सावकारीची तक्रार आल्यानंतर सातारा तालुका पोलिसांनी तसा गुन्हा दाखल केला. अवघ्या दोन दिवसात मटका व सावकारीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाच्या कक्षा आणखी रुंदावल्या व मटका प्रकरणी थेट त्याची लिंक गोवा राज्यापर्यंत असल्याचे समोर आले. सातारा पोलिसांचे एक पथक तयार करुन गोवा राज्यातूनही मटका बहाद्दर पकडण्यात आले. यावेळी पोलिसांनी गोवा येथून संशयितांच्या ताब्यातील 1 लाख 39 हजार 100 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला.

तब्बल 44 संशयित आरोपींची धरपकड झाल्यानंतर गुन्ह्याची तीव्रता ओळखून तपासाचा फास आवळण्यात आला. संशयित भिशी चालवून पैशांची देवाण-घेवाण करत गैरमार्गाने तेच पैसे गुुंतवून अवैध धंदे करत असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे चिट फंडचे कलमही संशयितांवर ठोकण्यात आले. अटक केलेले 44 व पसार दोघे अशा 46 जणांचा प्रस्ताव तयार करुन तो कोल्हापूर आयजी कार्यालयाला पाठवला असता त्यालाही मंजुरी मिळाली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, गेल्या 15 दिवसांमध्ये सातारा पोलिसांनी मटका किंग समीर कच्छी याला एका मागून एक धक्के दिले. अद्याप याचा तपास सुरू आहे. संशयित आरोपी वाढण्याची शक्यताही आहे. यामुळे यानंतर कोणाचा नंबर लागणार? नेमका कोणाचा प्रत्यक्ष सहभाग आहे? सातार्‍यातील मटका, जुगाराची पाळेमुळे आणखी कोणत्या जिल्ह्यात, राज्यात आहेत का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

5 राज्ये, 6 जिल्हे, 46 जण

एस.पी. समीर शेख यांनी केलेली ही कारवाई रेकॉर्डब्रेक ठरली आहे. या कारवाईची पाळेमुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, गोवा या राज्यात तर 6 जिल्ह्यांमध्ये असल्याचे समोर आले आहे. संशयितांमध्ये साहील ऊर्फ भैय्या शमीम ऊर्फ समीर शेख (वय 19), अमर पवार, धनंजय कदम, अश्विन माने, नासिरहुसेन शेख, सलीम खान, शकील सय्यद, राजेश कदम, विकास चव्हाण, संतोष माने, अक्षय सोनावणे, गजानन इरकल, किशोर साळुंखे, असद सय्यद, असिफ खान, संतोष गुरव, प्रकाश बोभाटे, श्रीकांत पाटील, विपुल जाधव, राजेंद्र उर्फ राहूल निंबाळकर (सर्व रा.सातारा परिसर व जिल्हा), विष्णू सोनटक्के (रा. इचलकरंजी जि. कोल्हापूर), शिवराम नारायण सुवर्णा (रा. मेंगलोर, कर्नाटक), नरेंद्र तायडे, सुमेध तायडे, गजानन तायडे, सुमेध अवचार, पुरुषोत्तम रोजतकार (सर्व रा.अकोला जिल्हा), यशवंत नायक (रा. गुजरात), अजय इंगोले, प्रतीक मुन, गजानन कणसे, शुभम राठोड, संतोष महाजन, सचिन खिची (सर्व रा.यवतमाळ जिल्हा), राजन कुमार (उत्तर प्रदेश), जयप्रकाश जयस्वाल (रा. ठाणे), अनिल मुंदडा (रा. छत्रपती संभाजीनगर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.

Back to top button