शिवकालीन हत्यारांच्या स्पर्शाने अंगावर रोमांच : आ. शिवेंद्रराजे भोसले | पुढारी

शिवकालीन हत्यारांच्या स्पर्शाने अंगावर रोमांच : आ. शिवेंद्रराजे भोसले

सातारा : पुढारी वृत्तसेवा : पुस्तकात इतिहास वाचणे आणि प्रदर्शनाच्या माध्यमातून तो अनुभवणे यात फरक आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना प्रदर्शनात आणून किल्ल्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन व शिवकालीन शस्त्रप्रदर्शन दाखवावे. शिवकालीन हत्यारांच्या स्पशनि आपण रोमांचित झालो, अशा शब्दांत आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी भावना व्यक्त केल्या.

साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या ‘शिवजयंती महोत्सवा’चा शानदार उद्घाटन सोहळा आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ प्रतिमेस आ. शिवेंद्रराजे भोसले व मान्यवरांनी अभिवादन केले. त्यानंतर मान्यवरांनी गड-किल्ल्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनास भेट दिली. शिवकालीन शस्त्र, हत्यारे, नाणी व वस्तूंची पाहणीही मान्यवरांनी केली.

त्यानंतर आ. शिवेंद्रराजे म्हणाले, मराठ्यांचा इतिहास काय होता हे पालकांनी मुलांना प्रदर्शनात आणून दाखवावे. जगातील अनेक वेगवेगळ्या वस्तूंचा समावेश या प्रदर्शनात आहे. ऐतिहासिक दिव्यांचे प्रकार, वजन मापे, नाणी आदि वस्तू या प्रदर्शनात असून या दुर्मिळ वस्तू अन्य ठिकाणी बघायला मिळणार नाहीत. हा आपला इतिहास आहे. या प्रदर्शनाचा लाभ शिवभक्तांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आ. शिवेंद्रराजे म्हणाले, अडकित्ता हे चांगलं शस्त्र आहे. अडकित्त्यात अडकवायचं चांगलं काम असतं. शिवकालीन हत्यारांना स्पर्श करता आला याचे वेगळेच समाधान आहे. शिवकाळात संबंधित हत्यारे कोणत्या योद्ध्याने वापरली असतील माहित नाही, पण माहिती घेताना सांगण्यात आले की स्वराज्यावर चाल करणाऱ्या शत्रूची शंभर माणसे मारल्यानंतर तलवारीवर एक ठोका मारला जायचा. असे ४७ ठोके मारलेली तलवार या प्रदर्शनात आहे. त्या तलवारीने शत्रूंचा इतक्या प्रमाणात सफाया करणारा तो योद्धा किती बलशाली, पराक्रमी असेल याची प्रचिती येते. त्या तलवारीला स्पर्श केल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहिले. मराठा साम्राज्याचा हा इतिहास आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर असलेले सरदार, मावळे यांनी त्यावेळच्या उपलब्ध तंत्रज्ञानातून कशी शस्त्रे निर्माण केली असतील असा प्रश्न पडतो. मोगल आणि त्यानंतर पोर्तुगिज, ब्रिटिश यांचा या लढवैय्यांनी कसा सामना केला असेल, शस्त्रांचा आकार व त्यावरील बारकावे पाहिल्यावर त्यावेळच्या मावळ्यांची बुद्धिमत्ता लक्षात येते. हा इतिहास शालेय विद्यार्थ्यांना माहित होणे आवश्यक आहे, असेही आ. शिवेंद्रराजे म्हणाले. बुध्दिमत्ता वापरून मावळ्यांनी हत्यारे बनवल्याचे तुम्ही सांगितलंत. साताऱ्याच्या विकासासाठी वाघनखं बाहेर काढण्याची वेळ आली आहे का?, असे विचारले असता ते म्हणाले, एवढी कुणाची फाडाफाडी करायची गरज नाही. सध्या विकास होत असून यापुढेही तो होत राहिल. साताऱ्याच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य मिळावे. विकासासाठी हत्यार लागत नाही. विकास करण्यासाठी वेळ द्यायला हवा. दगडं मारुन विकास होणार नाही. वेळ देणे, कामाचे नियोजन, परिश्रम, कष्ट आणि पाठपुरावा करणे ही विकासाची हत्यारं आहेत. एखाद्या कामाच्या मागं लागल्यावर ते काम शंभर टक्के पूर्ण होतं, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते आदित्य फडके (सातारा), प्रसाद बनकर (वाई) यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास विरोधी पक्षनेते अशोक मोने, नविआचे प्रतोद अमोल मोहिते, नगरसेवक अविनाश कदम, दिपक शिंदे, विजय देसाई, फिरोज पठाण, रवी माने, राजू गोरे, भालचंद्र निकम, महेश जगताप, महेश राजेमहाडिक, नगरसेविका आशा पंडित दीपलक्ष्मी नाईक सवर्णा पाटील उपस्थित होत्या.

प्रदर्शनात ३०० ते ४०० वर्षांपूर्वीची शस्त्रे

शिवकालीन शस्त्र प्रदर्शनामध्ये ३०० ते ४०० वर्षे जुन्या असलेल्या तलवारींचे, कट्यारचे विविध प्रकार, खंजीर, बिचवा, वाघनखे, ढाल, चंद्राकार तलवारी, माडू, मराठा धोप तलवार, मराठा वक्र तलवार, मराठा समशेर, मराठा तेगा तलवार, गोलिया तलवार, मुघल तलवार, रजपूत तलवार, दक्षिणात्य नायर तलवार, ब्रिटिशकालीन संगिनी, कर्द, चिलानम, पेशकवच, धनुष्यबाण, चिलखत- जिरेटोप, ब्रिटिश तलवार व ब्रिटिश तलवारींचे प्रकार, अडकित्ते व अडकित्त्यांचे विविध प्रकारांसह अनेक शस्त्रास्त्रे, १७व्या १८ व्या शतकामधील दुर्मीळ दिवे व दिव्यांचे प्रकार पाहण्यास उपलब्ध आहेत.

 

Back to top button