सातारा : माणदेशच्या रखरखत्या उन्हात भावा-बहिणीची वृक्षमाया | पुढारी

सातारा : माणदेशच्या रखरखत्या उन्हात भावा-बहिणीची वृक्षमाया

दहिवडी (जि.सातारा); पुढारी वृत्तसेवा : माणदेशी दुष्काळी भागातील गोंदवले खुर्द या छोट्याशा गावातील शालेय विद्यार्थी रोहित-रक्षिता या बहीण-भावंडांनी दुष्काळी परिस्थितीशी झुंज देत माण तालुक्यातील अनेक गावांत 9 हजारपेक्षा अधिक वृक्ष लागवड करून इतिहास रचला. तसेच अनेक गावांत सलग समतल चर काढून पाणी अडवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांनी घेतलेल्या या परिश्रमामुळे पाच वर्षांत अनेक टेकड्यांवर पाणी साचले आहे. याच पाण्याच्या माध्यमातून या वृक्षांचे संवर्धन केले जात आहे.

तसं पाहिलं तर सातारा जिल्ह्यातील दोन भिन्न भौगोलिक परिस्थिती निदर्शनास येतात… एकीकडे मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत होणारे थंड हवेचे ठिकाण पाचगणी वाई, महाबळेश्वर परिसरातील उंचच्या उंच सह्याद्रीच्या पर्वत रांगा व घनदाट जंगलाने व्यापलेल्या डोंगर दर्‍याखोर्‍या तर दुसरीकडे सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील माणदेशी भूभाग जो कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थितीत होरपळून जाणारा व सर्वात कमी पर्जन्यवृष्टी असणारा ओसाड, बोडक्या, काटेरी खुरट्या झुडपांचा दगड-धोंड्यांचा परिसर.या भागात आता पाणी येऊ लागले आहे. पण याच दुष्काळी भागातील गोंदवले खुर्द येथील रोहित व रक्षिता या बहीण-भावाने आमीर खान यांचा ‘सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम पाहिला. त्यामध्ये आमीर खान दुष्काळ व त्यावरील उपाययोजना हे चित्र समजून सांगत होते. रोहितने वयाच्या सोळाव्या वर्षांपर्यंत दुष्काळी परिस्थितीच्या झळा तीन वेळा सोसल्या होत्या. टीव्हीवर आमीर खान सांगत असलेल्या चिमणीच्या गोष्टीला प्रेरित होऊन रोहितने वयाच्या सोळाव्या वर्षी पर्यावरण संरक्षण व दुष्काळ मुक्तीसाठी (2018) पाहिले पाऊल उचलले. गावाच्या माथ्यावर लागलेला दुष्काळी परिस्थितीचा कलंक पुसण्यासाठी रोहितने गोंदवले खुर्दच्या ओसाड माळरानावर एकला चलोरे म्हणीप्रमाने दुष्काळी परिस्थिती विरुद्ध एकाकी लढा सुरू केला. थोरल्या भावाच्या मदतीला व त्याच्या संरक्षणाला तेरा वर्षांची रक्षीता माळावर श्रमदान करण्यासाठी सोबत येऊ लागली. त्यांनी पावसाचे वाहून वाया जाणारे पाणी अडवून जमिनीत मुरवण्यासाठी 70 समतल चरी खांदल्या. 4 फूट रुंद 2 फूट खोल व 10 फूट लांब. भरावा 30 फूट लांब 6 फूट रुंद व 7 फूट खोल एक छोटासा पाझर तलाव खोदून तयार केला आहे.

दोघांनी मिळून 40 दिवसांत केलेल्या श्रमदानातून शासकीय मोजमापानुसार एक वर्षाच्या एकूण पावसाचे एक कोटी लिटर पाणी अडवून जमिनीत मुरवण्यासाठी ही भावंडे यशस्वी झाली. एवढ्यावर न थांबता 2018 जूनमध्ये पहिल्या रिमझिम पावसाच्या सरीमध्ये वृक्षारोपण करण्यासाठी कधी पिंपरण किंवा वडाच्या मोठ्या फांद्यां आपल्या खांद्यावर घेऊन मोठ्या कष्टाने व मेहनतीने त्यांनी वृक्षारोपणास सुरुवात केली. विशाल अशा बोडक्या माळावर दगडधोंडे आणि खुरट्या झाडांशिवाय काहीही न उगवणार्‍या मुरमाड आणि काळ्या कातळाबरोबर दगडफोड तर कधी पावसाचे पाणी अडवण्यासाठी चर खोदण्यासाठी हे बहीण- भाऊ प्रयत्न करू लागले. तसेच कधी आपल्या मजबूत खांद्यावरून पाण्याने भरलेला कॅन असो अथवा मोठा माठ (घागर) घेऊन लावलेल्या झाडांना पाणी घालण्यासाठी कठोर मेहनत घेत काळ्या आईला हिरवा शालू नेसवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटू लागले.

हे करत असताना रोहित-रक्षिता या भावंडांनी ना उन्हाची पर्वा केली. ना मुरमाशी दोन हात करताना आलेल्या लहान-मोठ्या तळहातावरील फोडाची. दोघे दगडमातीशी टकरा द्यायचे काही केल्या थांबले नाहीत. अगदी कोणाच्याही मदतीशिवाय त्यांनी हे शिवधनुष्य पेलले आणि त्यात ते यशस्वी होताना दिसत आहेत. सलग पाच वर्षांत एक दिवस ही न थकता, न थांबता त्यांचा हा संघर्ष सुरू आहे. आजपर्यंत रोहित आणि रक्षिता यांनी वेगवेगळ्या सात ठिकाणी 9 हजारपेक्षा जास्त झाडे लावून जगवली आहेत. त्यांना अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी बोलावले जात आहे. शिखर शिंगणापूरच्या संपूर्ण डोंगर उतारावर त्यांना वृक्षारोपण करायचे आहे; पण त्यांना समाजाची साथ हवी. तरच लाखो झाडांची वनराई माण तालुक्यातील प्रत्येक गावात दिसेल.

वृक्षप्रेमी रोहितचा वनश्री पुरस्काराने सन्मान

गेल्या पाच वर्षांपासून माणदेशी दुष्काळी भागात अखंडितपणे पर्यावरण, निसर्ग संवर्धनासाठी व दुष्काळमुक्तीसाठी उल्लेखनीय कार्य करणार्‍या गोंदवले खुर्दच्या निसर्गप्रेमी रोहित शंकर बनसोडे याला महाराष्ट्र शासनाचा
2018 च्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. दि. 26 जानेवारी रोजी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत रोहितचा गौरव करण्यात आला. आपल्या कार्याच्या माध्यमातून रोहितने गोंदवले खुर्दचे नाव राज्यात उंचावले आहे.

Back to top button